निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे आता त्या बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार !
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | ELECTION COMMISSION | TRANSFER OF OFFICERS | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, राज्य प्रशासनाच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. निवडणुका पारदर्शी आणि मुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी आयोगाकडून निवडणुकांपूर्वी असे बदल्यांचे आदेश निवडणूका होणाऱ्या राज्यांना दिले जातात.
(संग्रहित दृश्य.)
अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश.
एकाच विधानसभा मतदारसंघात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले अधिकारी तसेच त्याच जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोग देत असते. यावेळीही राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.विशेष म्हणजे या बदल्या तातडीने करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यासाठी येत्या मंगळवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात राज्य प्रशासनात मोठे फेरबदल झालेले पाहायला मिळतील. महसूल, पोलिस, उत्पादनशुल्क, महापालिका, महामंडळे या विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या होण्याची शक्यता आहे. एकाच पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलेले किंवा गृह जिल्हा असलेले पोलिस दलातील आयुक्त, पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपायुक्त, निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच महसूल विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पालिका आयुक्त आदी अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या होणार असल्याचे सध्या संकेत आहे.