पती-पत्नी दोघेही आयएएस अधिकारी किंवा एक आयएएस आणि एक आयपीएस अधिकारी असणं यात काही नवल नाही. असे अनेक उदाहरणं देशात पाहायला मिळातात. मात्र, केरळमध्ये एक आगळा वेगळा आणि अभूतपूर्व क्षण पाहायला मिळाला आहे. केरळमध्ये पहिल्यांदाच आपल्या पतीच्या जागी मुख्य सचिवपदी पत्नी विराजमान झाली आहे. केरळचे मुख्य सचिव डॉ.व्ही.वेणू हे ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी शारदा मुरलीधरन यांच्याकडे सोपवली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शारदा मुरलीधरन यांच्या मुख्य सचिवपदाच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली. यामुळे केरळमध्ये एक अनोखा क्षण पाहायला मिळाला. आता शारदा मुरलीधरन यांनी त्यांचे पती डॉ.व्ही.वेणू यांच्या जागी राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला असल्याचं इंडिया टुडेनी एका वृत्तात म्हटलं आहे.
या योगायोगावर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटलं की केरळमध्ये पती आणि पत्नी दोघेही उच्च पदावर असल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली. मात्र पतीची जागा पत्नीने घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. डॉ.व्ही.वेणू आणि शारदा मुरलीधरन हे दोघेही १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.


