महाराष्ट्र्र : लक्ष्मण उतेकर यांच्या छावा या चित्रपटाची सगळीकडे चर्चा रंगली आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे विकीच्या कामाचे देशभरातून कौतुक केले जात आहे. आतापर्यंत आठ दिवसांत या चित्रपटाने २४० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.अजूनही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड चालूच आहे.
दरम्यान,छावा या चित्रपटात विकी कौशलने मुख्य भूमिका केलेली असली तरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी सर्वांत अगोदर विकी कौशलचा विचार करण्यात आलेला नव्हता. विकी कौशल ऐवजी सर्वांत अगोदर दाक्षिणात्य अभिनेता महेशबाबू याला विचारणा झाली होती. मात्र महेशबाबूने हा चित्रपट करण्यात उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी विकी कौशल याच्याशी संपर्क साधला. विकी कौशलने मात्र ही संधी सोडली नाही. त्याने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला. परिणामी आज हा चित्रपट सुपरहिट ठरण्याची शक्यता असून त्याची लोकप्रियताही वाढली आहे.