राहाता तालुक्यातील कोर्हाळे येथील भांबारे मळ्यातील साठवण तलाव निळवंडेच्या पाण्याने नुकताच भरला आहे. या तलावात बुधवारी दुपारी दोन सख्ख्या बहिण भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने परिसरातील हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मल्हारवाडी शिवारात राहत असलेल्या प्रशांत डोशी यांची मुले साहिल प्रशांत डोशी (वय १२, इयत्ता ६ वी) आणि दिव्या प्रशांत डोशी ( वय १५, इयत्ता १० वी) ही निळवंडेच्या पाण्याने भरलेल्या साठवण तलावात पाणी पाहण्यासाठी गेले असता साहीलचा पाय घसरुन तो पाण्यात पडला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागल्याने बहीण दिव्या हिने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तलावात पाण्याची खोली जास्त असल्याने दिव्याही पाण्यात बुडाली. दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना स्थानिक युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती मुलांचे वडील प्रशांत डोशी यांना दिली. तोपर्यंत स्थानिक युवकांनी पाण्यात उड्या मारुन साहील व दिव्याचा शोध सुरु केला होता. स्थानिक युवकांनी या दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना तात्काळ राहाता ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दोन दिवसापूर्वी या परिसरातील तलावात निळवंडे कॅनॉलचे पाणी सोडण्यात आले. परंतु या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने पोहण्यासाठी गेलेल्या या बहिण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. साहील व दिव्या यांच्या पश्चात वडील प्रशांत, आई, एक बहिणी, आजी, आजोबा असा परिवार असून वडील प्रशांत हे शेतीबरोबरच शिर्डीत फुल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. दरम्यान साहील व दिव्या हे श्रीगणेश इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिक्षक घेत होते. दोघेही अतिशय हुशार होते. दिव्याने नुकतीच दहावी पास होऊन ११ वीत प्रवेश घेतला होता. मितभाषी व हुशार असलेल्या दिव्याने आपल्या भावाला वाचविताना स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही. साहील व दिव्याचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. ते पाहून जमलेल्या गर्दीलाही अश्रु अनावर झाले.