अ नगर : सुगंधी तंबाखूच्या छाप्यातील कारवाई सौम्य करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकासाठी दीड लाख रुपये स्वीकारून उर्वरित रक्कमेच्या तडजोडी अंती ३० हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी मध्यस्थी करणाऱ्यास शिक्षकास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (दि.२०) एप्रिल रोजी रंगेहाथ पकडले आहे. विजय बाबासाहेब गर्जे (वय ४८, रा. पाथर्डी) असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की यातील तक्रारदार हे त्यांचे भावासह पान टपरी व शेतीचा व्यवसाय करतात. (दि.४) एप्रिलला पाथर्डी पोलिसांनी तक्रारदार यांचे राहते घराच्या बाजूला असलेल्या पत्राच्या शेडमध्ये छापा टाकून त्या ठिकाणी असलेली सुगंधी तंबाखू, सुपारी व मावा तयार करण्याचे साहित्य जप्त केले होते. सदरची कारवाई सुरू असताना तक्रारदार यांना त्यांचे ओळखीचे इसमाने शिक्षक विजय गर्जे यांना भेटण्यास सांगितले. तक्रारदार हे गर्जे यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना म्हटले की तुझ्या भावावर मोठ्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करावयाचा नसेल आणि तुला तपासात मदत हवी असेल तर तुला सहाय्यक पोलिस निरीक्षक यांचे करिता २ लाख रुपये द्यावे लागतील. त्यावेळी तक्रारदारांनी गर्जे यांच्या ओळखीचा इसमाच्या मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने स्वतःच्या अकाउंट वरून ५० हजार रुपये व नातेवाईकांच्या अकाउंटवरून १ लाख रुपये असे दीड लाख रुपये पाठवले होते. त्यानंतर (दि.१५) एप्रिल रोजी तक्रारदार यांनी विजय गर्जे यांना फोन करून भावाचे अटकपूर्व जामीन संबंधित विचारले असता त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना उर्वरित ५० हजार रुपये देऊन टाका व विषय मिटवून टाका असे म्हटले आणि जर तुम्ही पैसे नाही दिले तर ते तुमच्या भावाच्या अटकपूर्व जामीन मंजूर होऊ देणार नाहीत व त्याला अटक करतील असे बोलले. तक्रारदार यांची अजून लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलिस अधिकारी व आरोपी विजय गर्जे यांच्याविरुद्ध लाच मागणीबाबत तक्रार नोंदवलेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष केलेल्या पडताळणीमध्ये विजय गर्जे यांनी तडजोडीअंती ३० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. ही रक्कम दि.२० एप्रिल रोजी पंचासमक्ष स्वीकारताना त्यास रंगेहात पकडले. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.