नगर : केडगाव उपनगरात राहणार्या महिलेने तिच्या पतीच्या मदतीने पुण्यातील उरळी कांचन येथील रहिवासी असलेल्या सोनार व्यावसायिकाला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून वेळोवेळी २७ लाख ५६ हजार १६२ रूपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित सोनाराने रविवारी ( दि.६ एप्रिल) दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शितल कैलास काळे व तिचा पती कैलास अंबादास काळे (दोघे रा. दुधसागर सोसायटी, गल्ली नंबर तीन, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोनार व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे की, २०१२ साली व्यवसायाच्या ओळखीमुळे शितल काळे हिच्याशी संपर्क आला आणि ओळख पुढे वाढत गेली. वेळोवेळी फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटीव्दारे दोघांत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. पुढे शितल हिने भावनिक ओलावा निर्माण करून शारिरीक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर हे संबंध गुप्त व्हिडीओ व फोटोंच्या आधारे ब्लॅकमेलिंगसाठी वापरण्यात आले. दरम्यान, याच फोटो आणि व्हिडीओंच्या आधारे धमकावून वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. पार्लर उघडण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करून सुमारे ९८ हजार ८१२ रूपयांचे साहित्य, रोख रक्कम दिली.
(संग्रहित दृश्य.)
तसेच दोन वेळा वेगवेगळ्या मोपेड गाड्याही घेतल्या. २०२४ साली फिर्यादी यांनी स्वतःच्या पत्नीच्या नावावरील घर विकून १८ लाख रूपये मिळवले. यापैकी बहुतांश रक्कम शितल हिला दिली असून, त्या पैशातून तिने केडगाव उपनगरातील भुषणनगर भागात ४३ लाखांचे घर खरेदी केले. त्या घरावरील कर्जाचे हप्तेही फिर्यादी यांनी भरण्याचे कबूल केले. मार्च २०२५ मध्ये हप्ता न भरल्याने शितल हिने फिर्यादीला पुन्हा धमकावणे सुरू केले. आजपर्यंत फिर्यादी यांनी ऑनलाईन पध्दतीने पाच लाख ४७ हजार ८१४ रुपये व रोख स्वरूपात तर २२ लाख आठ हजार ३४८ रुपये, तसेच दोन मोपेड गाड्या असे एकूण अंदाजे २७ लाख ५६ हजार १६२ रुपये शितल व तिच्या नवर्याला दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत केला आहे.