ईव्हीएम व व्हिव्हिपॅटवर खापर न फोडता पराभव मान्य करा, खासदार निलेश लंकेंचा सुजय विखेंना सल्ला…..
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | POLITICS | MP NILESH LANKA | FORMER MP SUJAY VIKHE SUJAY | VIKHE'S DEMAND FOR INQUIRY ON EVM MACHINE AND VIVIPAT IS WRONG | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
ईव्हीएम मशिन तसेच व्हिव्हिपॅटवर संशय घेत त्याच्या चौकशीची भाजपाचे पराभूत उमेदवार माजी खासदार सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली मागणी चुकीची असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे खासदार नीलेश लंके यांनी विखे यांनी ईव्हीएमवर खापर न फोडता पराभव मान्य करा असा सल्ला त्यांना दिला आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी ईव्हीएम मशिन तसेच व्हिव्हिपॅटवर संशय घेत श्रीगोंदे येथील १०, पारनेर १०, नगर,शेवगांव-पाथर्डी व कर्जत-जामखेड, व राहुरी येथील प्रत्येकी ५ मतदान केंद्रांवरील ईव्हीएम व व्हिव्हिपॅट पडताळणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. सुजय विखे यांच्या या मागणीनंतर खासदार नीलेश लंके यांनी पराभवाचे खापर ईव्हीएमवर न फोडता पराभव मान्य करा असा सल्ला हंगे येथे गुरूवारी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
खासदार लंकेचा सुजय विखेंना सल्ला….
यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले कि माझ्या राजकीय जीवनात मी अनेक निवडणूका पाहिल्या आहेत. जिल्हा, राज्य व केंद्र स्तरीय निवडणूका मी हाताळल्या असून त्या पारदर्शीपणे पार पडल्याचा माझा अनुभव आहे. नगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर राज्यात सर्वात उशिरा या मतदारसंघाचा निकाल जाहिर झाला आहे. प्रत्येक गोष्ट चार चार वेळा प्रत्येक अधिकाऱ्याने नजरेखालून घातली आहे. चार चार वेळा प्रत्येक आकडे तपासण्यात आले आहेत . प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच-पाच व्हिव्हिपॅट मशिन मधील चिठ्ठ्या मोजण्यात आल्या आहेत. त्यात कोठेही फरक आढळून आलेला नाही. त्यामुळे भाजपाचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी केलेली मागणी चुकीची असल्याचे लंके यांनी सांगितले आहे. सुजय विखे यांच्या मागणीचा दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्यांना त्यांचा पराभवच मान्य नाही असा त्याचा अर्थ होतो. निवडणूकीत ज्यावेळी सत्तांतर होते, त्यावेळी विजयी झाल्यानंतर विजयाचा आनंद पचविता आला पाहिजे, आणि पराभवही पचविता आला पाहिजे असे खासदार लंके म्हणाले आहेत.
स्त्रोत सोशल मिडिया
ईव्हिएमध्ये घोटाळा झाल्याचे सांगून समाजाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न – खासदार निलेश लंके
विखे कुटूंबाची ही राजकीय परंपरा आहे. सुजय विखे यांचे आजोबा स्व. बाळासाहेब विखे हे यशवंतराव गडाख यांच्याकडून पराभूत झाले त्यावेळीही निवडणूक आयोगाकडे जाऊन, तत्कालीन निवडणूक आयुक्त टी एन शेषण यांनी भेट घेऊन त्यांनी आक्षेप नोंदविला होता याची आठवणीही खासदार लंके यांनी करून दिली आहे. मला कालच समजले की माझ्या ज्या प्रचार सभा झाल्या, त्याचे व्हिडीओ चित्रीकरणाची मागणी करण्यात आली आहे. तुम्ही पराभव मान्य करायला शिका. समाजापुढे जाताना समाजाला सांगू शकत नाहीत की मी माझ्या कर्तुत्वामुळे पराभूत झालो आहे. ईव्हिएमध्ये घोटाळा झाल्याचे सांगून समाजाची दिशाभुल करण्याचा हा प्रयत्न आहे. व्हिव्हिपॅडमध्ये घोटाळा झाला, अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नाही, हे करण्यापेक्षा त्यांनी पराभव मान्य करायला शिकले पाहिजे असा सल्ला खासदार लंके यांनी सुजय विखेंना दिला आहे. देशामध्ये, राज्यामध्ये आजवर अशा प्रकारचे आरोप झाले आहेत. सत्तेत असलेल्या पक्षाचा पराभूत उमेदवार अशी तक्रार करीत असेल तर त्याचा आक्षेप सरकारवरसुध्दा आहे असेच म्हणावे लागेल. त्यांनी भाजपाला घरचाच आहेर दिला आहे. केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप घेण्यासारखा हा प्रकार असल्याचे खासदार लंके म्हणाले आहेत.