अहिल्यानगर : जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर अंतर्गत संपूर्ण सुरक्षा केंद्र, जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्या वतीने,व जय अंबिका तरुण मंडळ यांच्या सहकाऱ्याने जागतिक महिला दिनानिमित्ताने सोमवार (दिनांक १० मार्च २०२५) रोजी सकाळी १०:३० ते ४:०० दरम्यान मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर तुळजाभवानी मंदिर, छत्रपती संभाजी महाराज चौक, विजय नगर, आलमगीर रोड, भिंगार, अहिल्यानगर या ठिकाणी असून शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्या हस्ते होणार आहे.
सदर शिबिरामध्ये जनरल फिजिशियन,अस्थिरोग तज्ञ,स्त्री रोग तज्ञ,नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, दंतरोग तज्ञ , बालरोग तज्ञ, क्षयरोग तज्ञ, मानसिक आरोग्य तज्ञ इत्यादींमार्फत नागर देवळे, बारा बाभळी , वडारवाडी, भिंगार परिसरातील सहभागी महिला, नागरिक, मुले यांची आरोग्य तपासणी होणार आहे. शिबिरात सर्व रुग्णांची आरोग्य तपासणी होऊन गरजेनुसार रक्त तपासण्याची सुविधा व मोफत औषध वितरण केले जाणार आहे. गंभीर आजाराच्या रुग्णांना पुढील संदर्भ सेवा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी नागरदेवळे,बाराभाबळी,वडारवाडी तसेच भिंगार परिसरातील जास्तीत जास्त महिला, नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन एस चव्हाण यांनी केले आहे.