अहिल्यानगर- सावेडी परिसरातील पाईपलाईन रोड येथे दि.२ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारणार्या २९ वर्षीय महिलेस एकटक पाहून अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती बहिणीसोबत रात्री जेवणानंतर कॉलनीमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेली होती. त्यावेळी विनायक नन्नवरे (वय ३२, रा. यशोदानगर कॉलनी, पाईपलाईन रस्ता) याने तिच्याकडे एकटक पाहून अश्लील हावभाव करत तिचा मानसिक छळ केला. त्याच्या हातातील प्लास्टिकच्या पिशवीतून काहीतरी वस्तू काढून तो अश्लील हावभाव करत होता. त्यानंतर त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करत पीडितेला ठार मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने तात्काळ डायल ११२ वर संपर्क साधत पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी संपूर्ण माहिती घेत संशयित आरोपी विनायक नन्नवरे याला ताब्यात घेतले आहे.