TIMES OF AHMEDNAGAR
दिल्लीतल्या आम आदमी पार्टीच्या सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात दिल्लीतल्या महिलांना दर महिन्याला १,००० रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल यांच्यामागे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यातच केजरीवाल यांना गेल्या महिन्यात २१ मार्च रोजी ईडीने अटक केली. त्यामुळे अनेक सरकारी योजना प्रलंबित आहेत. तसेच राज्याच्या कारभारात अनेक अडचणी येत आहेत. केजरीवाल तुरुंगात असल्याने दिल्ली सरकारचं वीज आणि पाण्यावरील अनुदान (सबसिडी) आणि महिलांचा बसमधून होणारा मोफत प्रवास बंद होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
दिल्ली सरकार पाणी आणि वीजेवरील अनुदान बंद करणार नाही.
सरकारी योजना आणि अनुदान बंद होणार असल्याच्या अफवा पसरू लागल्यानंतर दिल्ली सरकारने अधिकृत निवेदन जारी करत म्हटलं आहे की, कोणतीही योजना किंवा अनुदान बंद केलं जाणार नाही. यावरून स्पष्ट झालं आहे की दिल्ली सरकार पाणी आणि वीजेवरील अनुदान बंद करणार नाही. तसेच दिल्लीतल्या महिला डीटीसी बसमधून मोफत प्रवास करू शकतात. यासह इतर योजनादेखील चालू राहतील.
स्त्रोत.सोशल मिडिया.
तुरुंगातही दिल्लीतल्या जनतेची चिंता आहे.
दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी मार्लेना यांनी सोमवारी (२९ एप्रिल) तिहार तुरुंगात जाऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर आतिशी म्हणाल्या, केजरीवाल यांना तुरुंगातही दिल्लीतल्या जनतेची चिंता आहे. मी त्यांना विचारलं की, ते कसे आहेत ? त्यावर ते म्हणाले, तुम्ही माझी काळजी करू नका, माझ्या आरोग्याची देखील काळजी करू नका. दिल्ली सरकारचं काम कसं चाललंय ते सांगा. शाळेतल्या मुलांना वेळेवर पुस्तकं मिळतायत का ? विद्यार्थ्यांचं शिक्षण वेळेवर चालू आहे ना ? शाळांमध्ये कुठलीही अडचण नाही ना ? मोहल्ला क्लिनिकमध्ये औषधं वेळेवर पोहोचतायत की नाही ? अनेक ठिकाणांहून तक्रारी येत होत्या की, मोहल्ला क्लिनिकमध्ये पुरेशी औषधं नाहीत. ती समस्या आपण सोडवली का ? उन्हाळा वाढलाय त्यामुळे दिल्लीत पाण्याची समस्या निर्माण झाली असेल कुठेही पाणी कमी पडता कामा नये.