सांगली : बचत गटाचे निविदेनुसार देयक अदा करण्यासाठी ४० हजारांची लाच घेत असताना समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांना लाचलुचपत विभागाने गुरुवारी (दि.१७) अटक केली आहे. कार्यालयातील कक्षातच लाच घेत असताना नितीन उबाळे लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत. तक्रारदाराचे बचत गटाच्या निविदेनुसार ८ लाख १२ हजार रुपये देयक मंजुरीसाठी दहा टक्के लाच मागणी नितीन उबाळे यांनी केली होती. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची नियमानुसार पडताळणी करण्यात आली असता लाच मागणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. देयकाच्या दहा टक्केप्रमाणे ८० हजाराची लाच मागणी करण्यात आली होती. मात्र तडजोडीमध्ये ही ५ टक्केप्रमाणे ४० हजार रुपये ठरले. गुरुवारी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. सहायक आयुक्त नितीन उबाळे कार्यालयाच्या प्रधान कक्षामध्येच ४० हजार रुपये लाच घेत असताना पथकाने छापा टाकून त्यांना रंगेहात अटक केलेली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार नितीन उबाळे यांच्या विरुध्द सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे,विनायक भिलारे, कर्मचारी प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, धनंजय खाडे, सीमा माने, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव आदींच्या पथकाने गुह्ना दाखल केला आहे.