TIMES OF NAGAR
नगर – दिवसभर विविध कामे करुन रात्रशाळेच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगले. अर्धवट शिक्षणानंतर पुन्हा रात्रशाळेत प्रवेशित झालेले अनेक ज्येष्ठ विद्यार्थी आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणी जाग्या केल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सीए अशोक गुर्जर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या तसेच भाई सथ्था नाईट हायस्कूलचा वाढत असलेला नाव लौकिकाबद्दल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे, चेअरमन व शालेय समितीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी सीए करण्यासाठी पुढे यावे सीए करण्यासाठी इंग्रजी व गणित या विषयाचे ज्ञान आवश्यक आहे सीएचे काम करण्यासाठी कुठलेही भांडवल लागत नाही ज्या विद्यार्थ्यांना सीएचे कामकाज करण्याची इच्छा असेल अशा विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले. या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर व शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश ढवळे उपस्थित होते रात्र शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक करून अभिनंदन केले. यावेळी पेमराज सारडा महाविद्यालयाचे उपप्राचार्य गिरीश पाखरे, सीनियर कॉलेजच्या प्राचार्या माहेश्वरी गावित, सीए अशोक गुर्जर, हिंद सेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजितशेठ बोरा, भाई सथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन पारस कोठारी, सिताराम सारडा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंगला भोसले, नाईट स्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब गोरडे, शिक्षकेतर प्रतिनिधी अविनाश गवळी आदींसह नाईट स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



