कर्जत : नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी २८ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी काँग्रेसच्या उपनगराध्यक्षा रोहिणी घुले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) छाया शेलार यांच्या नावाची चर्चा आहे. जर या दोन नावांवर एकमत झाले नाही, तर तिसऱ्या उमेदवाराची निवड होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यासोबतच उपनगराध्यक्षपदासाठीही नगरसेवकांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. कर्जत नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरुद्ध सत्ताधारी गटातील ११ आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) २, अशा १३ नगरसेवकांनी अविश्वास ठराव मांडला होता. मात्र, मतदानापूर्वीच राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या रिक्त पदासाठी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रांताधिकारी नितीन पाटील यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज सोमवार २८ एप्रिल सकाळी ११ वाजेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात झाली असून दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होईल. त्याच दिवशी अर्जांची छाननी होऊन वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. २ मे २०२५ रोजी विशेष सभेत नवीन नगराध्यक्षाची निवड होईल.
(संग्रहित दृश्य.)
शेलार,घेले स्पर्धा कायम मात्र वरिष्ठ नेत्यांचा निर्णय अंतिम…
नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या रोहिणी घुले यांचे नाव आघाडीवर आहे. सध्या त्या उपनगराध्यक्षा असून, त्यांच्या अनुभवामुळे त्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे ८ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने छाया शेलार याही या पदासाठी इच्छुक आहेत. दोन्ही पक्षांमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू असून, वरिष्ठ नेत्यांचा निर्णय अंतिम ठरेल. जर घुले आणि शेलार यांच्यात एकमत झाले नाही, तर ऐनवेळी तिसरे नाव समोर येण्याची शक्यता आहे. प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षांमध्ये समतोल राखण्याचे आव्हान असेल. उपनगराध्यक्षपदासाठी ही नगरसेवकांमध्ये चुरस आहे. सत्ताधारी गटातील उर्वरित ११ नगरसेवक आपली दावेदारी मांडत आहेत. यामध्ये गटनेते संतोष मेहेत्रे आणि सुवर्णा सुपेकर यांची नावे आघाडीवर आहेत. भाजपच्या दोन नगरसेवकही या पदासाठी प्रयत्नशील आहेत. काही नगरसेवकांनी सत्ताधारी गटाला लाथ मारून बाहेर पडल्याने त्यांचाही विचार व्हावा, अशी मागणी केली आहे. यामुळे उपनगराध्यक्षपदाची निवडही तितकीच उत्सुकतेची ठरणार आहे.
(संग्रहित दृश्य.)
राउत कुटुंबाचे राजकीय उध्वस्तीकरण ?
कर्जत नगरपंचायतीच्या स्थापनेपासून राऊत कुटुंबाने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदावर आपली पकड कायम ठेवली होती. २०१५ ते २०२० या काळात नामदेव राऊत यांनी भाजपच्या कार्यकाळात अडीच वर्षे नगराध्यक्ष आणि नंतर अडीच वर्षे उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. २०२२ मध्ये त्यांनी भाजप सोडून आमदार रोहित पवार यांच्यासोबत जाऊन आपली सुन उषा राऊत यांना नगराध्यक्षपदी बसवले. उषा राऊत यांनी सव्वातीन वर्षे कार्यभार सांभाळला, परंतु सत्ताधारी गटातील बंडखोरीमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. सध्या कर्जत नगरपंचायतीत सत्ताधारी गटात राष्ट्रवादीचे ८, काँग्रेसचे ३ आणि भाजपचे २ असे १३ नगरसेवक आहेत, तर विरोधी रोहित पवार गटाकडे ४ नगरसेवक आहेत. या राजकीय गटबाजीमुळे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया अधिक रंजक ठरणार आहे. सत्ताधारी गटातील एकजूट आणि विरोधी गटाची भूमिका यावर निवडीचे भवितव्य अवलंबून आहे. या निवडीमुळे कर्जतच्या स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.