अहिल्यानगर : शासकीय ठेकेदाराच्या संस्थेत लिपीक म्हणून काम करणार्या इसमाने एकमत करत १ कोटी २६ लाख १३ हजारांची हेराफेरी करत संस्थेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत शासकीय ठेकेदार असलेले संदीप भापकर (रा. दिल्लीगेट) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीराम फुंदे, कांचन फुंदे व महेश जावळे (रा. लोहारवाडी, ता. नेवासा) अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी संदीप भापकर यांच्या एस.आर. कन्स्ट्रक्शन या फर्ममध्ये फुंदे हे कामाला होते. सन २०१८-१९ पासून संस्थेच्या अकाउंटची कामे व आर्थिक व्यवहार पाहत होते. संस्थेचे आयकर रिटर्न्स हे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात भरला जातो. त्यामुळे जुलै २०२४ मध्येच आर्थिक व्यवहाराच्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली. हे सर्व फुंदे हाच करत होता. त्यास इतर कर्मचारी मदत करत होते. या कर्मचार्यांना २०२३-२४ या वर्षाचा ओपन आणि क्लोजिंग बॅलन्स जुळत नव्हता, ही बाब इतर कर्मचार्यांनी फिर्यादी संदीप भापकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी सखोल माहिती घेत बँक व्यवहार तपासले असता फुंदे याने त्याच्या बँक खात्यात ४९ लाख २९ हजार ९९९ रुपये, तसेच त्याची पत्नी कांचन फुंदे हिच्या बँक खात्यात १४ लाख ९० हजार ४८३ रुपये तर त्याचा मित्र महेश जावळे याच्या खात्यात ६१ लाख ९२ हजार ८४५ रुपये असे १ कोटी २६ लाख १३ हजार ३२७ रुपये एवढी रक्कम वर्ग करून संस्थेच्या पैशाची हेराफेरी केली असल्याचे भापकर यांनी सांगितले.
(संग्रहित दृश्य)
ही बाब समोर आल्यावर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तयारी केल्यावर त्याची आई, भाऊ व इतरांनी आम्ही सर्व रक्कम परत करतो, असे सांगत राहते घर, शेतजमीन विक्री करून ती परत करण्याबाबत हमीपत्र लिहून दिले. पुन्हा खोटे कागदपत्रांच्या आधारे एस.आर. कन्स्ट्रक्शन या फर्मच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करत पुन्हा विश्वासघात केला आहे. त्यामुळे भापकर यांनी अखेर ३१ जानेवारीला श्रीराम फुंदे, कांचन फुंदे, महेश जावळे यांच्या विरोधात फिर्याद दिली असून, या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.