OPERATION SINDOOR : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये (दि.२२) एप्रिलला दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात पहलगामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरलेली होती. या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर दिलं जावं अशी मागणी सातत्याने होत होती. आज बुधवार (दि.७) अखेर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने पाकिस्तानातील तब्बल ९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना उद्ध्वस्त केले. या संपूर्ण मोहिमेची माहिती “नारी शक्ती”ने दिली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर, लष्कराकडून पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती देण्यात आली. यामध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हवाई दलातील व्योमिका सिंग त्यांच्यासोबत लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी या मोहिमेबाबत माहिती दिली आहे.
(संग्रहित दृश्य.)
पाकिस्तानला दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून जगभरात मान्यता….
यावेळी माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितलं की, जम्मू काश्मीरमधील वाढतं पर्यटन आणि चांगली होत असलेली अर्थव्यवस्था यांच्यावर परिणाम करण्यासाठीचा पहलगाममध्ये हा प्रयत्न केला होता. या हल्ल्याचा उद्देश विकास आणि प्रगती थांबवून राज्याला मागास करणे हा त्यांचा हेतू होता. या हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग उघड आहे, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना शासन होणं गरजेचं होतं. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली आहे. हल्लेखोरांचीही ओळख पटली आहे. आमच्या गुप्तचर यंत्रणेने हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांबद्दल माहिती गोळा केली आहे. या हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध आहे. पाकिस्तानला दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून जगभरात मान्यता मिळाली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. हल्ल्याच्या पंधरा दिवसांनंतरही पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. भारताने दहशतवाद संपवण्यासाठी प्रतिसाद दिला आहे. दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमधील विकास थांबवू इच्छितात. टीआरएफ ही लष्करशी जोडलेली संघटना आहे. पहलगाम हल्ल्यात टीआरएफचा सहभाग आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे.
(ऑपरेशन सिंधू, स्त्रोत.सोशल मिडिया.)
फक्त दहशतवादी ठोकले,सर्वसामान्यांना नुकसान नाही….
भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते. या कारवाईत ९ दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य करून नष्ट करण्यात आले आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली. मार्च २०२५ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील चार जवानांची हत्या करण्यात आली होती. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले. मरकज सुभानल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही आणि नागरिकांची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी टार्गेट असलेली ठिकाणे उद्ध्वस्त झाल्याचे फोटो देखील त्यांनी दाखवले. भारताने केलेल्या संपूर्ण कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोफिया कुरेशी माहिती देताना म्हणाल्या, आम्ही पीओके आणि पाकिस्तानमधील एकूण ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यांदरम्यान, आम्ही खात्री केली की फक्त दहशतवादी मारले जातील आणि कोणत्याही नागरिकाचे नुकसान होणार नाही. आम्ही कोटली अब्बासमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलं. या छावणीत सुमारे १५०० दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. याशिवाय, पाकिस्तानी पंजाबमधील बहावलपूर आणि महमूना झोया येथेही दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.