राहुरी विधानसभा मतदारसंघात यंदा भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात सरळ लढत होत आहे. महायुती व महाविकास आघाडी या थेट लढतीत प्रचाराला वेग आला आहे. शिवाजी कर्डिले यांनी मागील निवडणुकीतील पराभव पुसुन काढण्यासाठी यंत्रणा सक्रिय केली आहे.
(संग्रहित दृश्य.)
यंदा मतदारसंघात मोठा राजकीय बदल पहायला मिळणार….
राहुरी तालुक्यात कर्डिले यांनी जोरदार मोर्चेबांधणी करून तनपुरे गटातील अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांना भाजपमध्ये आणले आहे. या मतदारसंघात नगर तालुका व पाथर्डी तालुक्यातील गावांचाही समावेश आहे. या दोन्ही तालुक्यात कर्डिले यांचे राजकीय वजन अधिक आहे. त्यांनी संपूर्ण मतदारसंघात बेरजेचे राजकारण करण्यावर भर दिला आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम हे कर्डिलेंच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. याशिवाय मागील निवडणुकीत तनपुरेंसाठी ताकद लावणारे ज्येष्ठ नेते शिवाजीराव गाडे यांचे चिरंजीव धनराज गाडे यावेळी कर्डिलेंसाठी ताकद लावत आहेत. त्यामुळे यंदा मतदारसंघात मोठा राजकीय बदल पहायला मिळत आहे. पाच टर्म आमदार म्हणून विजयी झालेल्या कर्डिले यांच्या घोडदौडीला सन २०१९ च्या निवडणुकीत ब्रेक लागला होता. मात्र पराभवानंतरही त्यांनी मतदारसंघात संपर्क कायम राखला. दररोजच्या जनता दरबारात सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. याशिवाय जिल्हा बँकेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी चांगल्या योजना राबविल्या. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी विशेष योजना आणून दुध उत्पादकांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्याचा प्रयत्न केला. राज्यात अडीच वर्षांपूर्वी सत्ता परिवर्तन होऊन भाजप महायुतीचे सरकार आले. राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यांच्या माध्यमातून कर्डिले यांनी मतदारसंघातील गावागावात विकासकामे करण्यावर भर दिला आहे. वांबोरी चारीचा विषय मार्गी लावण्यात त्यांना यश आले आहे. याशिवाय राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजना, शेतकरी सन्मान योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांनी सक्षमपणे योगदान दिले. दहा वर्षे मतदारसंघात केलेली विकासकामे समोर ठेवून कर्डिले पुन्हा एकदा मतदानाचे आवाहन करीत आहेत. याशिवाय भाजप महायुती सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळेही ग्रामीण भागात भाजपला असलेले अनुकूल वातावरण कर्डिले यांच्या पथ्यावर पडू शकते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः राहुरी मतदारसंघात लक्ष घालत पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.