स्वतःच्या दोन भावजयींचा निर्घृणपणे खून करणार्या माथेफिरूला अखेर अकोले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बेलापूर बदगी येथे सोमवारी दत्तात्रय फापाळे याने शेती व पैशाच्या किरकोळ वादातून आपली सख्खी भावजय उज्ज्वला अशोक फापाळे (वय ३०) हिचा कोयत्याने सपासप वार करून खून केला. यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणार्या वैशाली संदीप फापाळे (वय ४०) या आपल्या दुसर्या भावजयीचाही रागाच्या भरात तशाच पदधतीने खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
(संग्रहित दृश्य.)
१७ तासानंतर पठारभागातील भोजदरी येथील डोंगरावर आरोपीला अटक.
या घटनेनंतर आरोपी दत्तात्रय फापाळे घटनास्थळावरून पसार झाला होता. हातात कोयता घेतलेल्या स्थितीत जात असताना तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच अकोलेचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी देखील घटनास्थळ धाव घेतली. पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेत तपासाची चक्रे वेगाने फिरविली. तातडीने आरोपीचा शोध सुरू केला.
पोलिसांनी आरोपीला अखेर त्याला १७ तासानंतर पठारभागातील भोजदरी येथील डोंगरावर सकाळी अटक केली. आरोपीस अकोले येथे आणण्यात आले. याप्रकरणी शहाजी रखमा शिंगोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्ता उर्फ बापू प्रकाश फापाळे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी दत्तात्रय फापाळे याला बुधवारी नायायालयासमोर हजर केले जाणार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे हे करत आहेत. दरम्यान दोन्हीही महिलांवर बेलापूर येथे शोकाकूल वातावरणात मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता.