नगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार) उमेदवार निलेश लंके यांनी पोलीस प्रशासनाला खुली धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लंके यांनी पोलिसांवर केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले की साध्या माणसाचा खरा चेहरा आता लोकांसमोर येऊ लागला असून दहशत, गुंडगिरी अशी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार असा जोरदार शाब्दिक टोला मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नामोल्लेख टाळत निलेश लंके यांना लगावला आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री विखे म्हणाले की जिल्ह्यातून पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी ८ वेळा संसदेत प्रतिनिधित्व केले. शिर्डी विधानसभा मतदार संघातील जनतेने मला ७ वेळा आमदार म्हणून निवडून दिले. हे पद्मश्रींनी दिलेल्या विचारांचे यश आहे. त्यांच्या संस्कारातच विखे परिवाराची अविरत वाटचाल सुरू असून सार्वजनिक जीवनात मिळालेली प्रत्येक संधी परिवाराने जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाच्या उत्कर्षासाठी कारणी लावली.