काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत ३० भाविकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत २००० लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. आता यावर संजय राऊत यांनी सविस्तर भाष्य केले आहे. खासदार राऊत म्हणाले की, संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना या देशात प्रयागराजमध्ये महाकुंभात दुर्घटना घडली. महाकुंभ हे आमच्या सर्वांसाठीच आस्थेचा विषय आहे. धर्माचा विषय आहे. आम्ही सगळेच त्याच्याशी भावनिक नात्याने जोडलेलो आहोत. शिवसेनेचे आमचे अनेक सहकारी कुंभला जाऊन स्नान करून आले आहेत. पुढील आठवड्यात मी स्वतः जाण्याची योजना आखत आहे. पण जी दुर्घटना घडली त्याला कोणीतरी जबाबदार आहे. ज्या पद्धतीने त्या दिवशी चंगराचेंगरी झाली याची कारणे काय आहेत ? नक्की किती श्रद्धाळू तिथे मरण पावले ? असा सवाल राउत यांनी यावेळी उपस्थित केला.
(संग्रहित दृश्य.)
तीस हजाराच्यावर सीसीटीव्ही कॅमेरे, कॅमेऱ्याचे फुटेज लोकांसमोर का आणत नाही ?
खासदार राऊत पुढे म्हणाले की, मी असे म्हणत नाही की, सरकारमुळे हे झाले आहे किंवा कोणी विशिष्ट व्यक्ती जबाबदार आहे. आजही तिकडे दोन ते अडीच हजार लोक त्या दिवसापासून बेपत्ता आहेत. चार दिवसापूर्वी कचऱ्याच्या ढिगार्याखालून मृतदेह काढण्यात आली. मृतांचा आकडा किती आहे ? लोकांमध्ये चर्चा आहे की दोन ठिकाणी भगदड झाली. तेथे साधारण पंधराशे ते दोन हजार लोक हे मरण पावले असावेत, असा दावा त्यांनी केली आहे. तिथे तीस हजाराच्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज लोकांसमोर का आणत नाही ? असा सवाल देखील संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. त्या दिवसापासून दोन हजार लोक बेपत्ता आहेत तर त्यांचे काय झाले ? याचा अर्थ दोन हजार लोक मरण पावली का ? नंतर त्यांचे मृतदेह सापडत नाही किंवा त्यांचे मृतदेह गायब केली, याच्यावर सत्ताधारी पक्षाच्या बाकावरून विरोध सुरू झाला. आणि उपसभापतींनी माझा माईक बंद केला, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.