TIMES OF NAGAR
अहिल्यानगर : एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जुगार अड्ड्यांवर एकाच दिवशी छापा टाकून एकूण १७ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकूण दोन लाख २७ हजार ९३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान यामध्ये एका पतसंस्थेचा व्हा. चेअरमन, वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकार्यांचा समावेश आहे. यामुळे एमआयडीसीत या कारवाईची जोरदार चर्चा रंगली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी रविवारी (दि.११ मे) एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहितीच्या आधारे दोन ठिकाणी छापे टाकले. सह्याद्री चौक ते चाकण ऑईल मिल रस्त्यालगत असलेल्या हॉटेल जनता दरबारच्या मागील पटांगणात व वडगाव गुप्ता ते शेंडी जाणार्या रस्त्यालगत असलेल्या उघडमळा शेतजमिनीत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. किरण प्रभाकर पानपाटील (रा. भिंगार), अविनाश माणिक भोसले (रा. पाथर्डी), एकनाथ केरू कोतकर (रा. इसळक, ता. अहिल्यानगर), प्रदीप भाऊसाहेब कोहोक (रा. दौलावडगाव, नागापूर), महेंद्र शिवराय कदम (रा. नवनागापूर), रवींद्र रावसाहेब साळवे (रा. माळीवाडा), अनिल चंदू मके (रा. निंबळक, ता. अहिल्यानगर), विशाल भाऊसाहेब पाटोळे (रा. नागापूर), नीलेश भालचंद्र भाकरे (रा. नागापूर), चंद्रकांत बबन आंबेडकर (रा. माळवाडी, वडगाव गुप्ता), राजेंद्र शिवराम कदम (रा. वडगाव गुप्ता), सावता आष्टीम चव्हाण (रा. माळवाडी, वडगाव गुप्ता), भाऊसाहेब रामचंद्र वरूटे (रा. भैरवनाथ मंदिराजवळ, वडगाव गुप्ता), शंकर रामभाऊ धुमाळ (रा. धुमाळ वस्ती, वडगाव गुप्ता), नारायण धोंडीराम शिंदे (रा. भैरवनाथ मंदिराजवळ, वडगाव गुप्ता), भाऊराव लहानु शिंदे (उघड मळा, वडगाव गुप्ता), हुसेन गुलाब सय्यद (रा. वडगाव गुप्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्या जुगार्यांची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.