अहिल्यानगर महापालिकेसह जिल्ह्यातील बारा नगरपालिका व नगरपंचायतींच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम शासनाने जाहीर केला आहे. त्यामुळे महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी सुरु झाली आहे. गेल्या तीन वर्षापासून नगरपालिका आणि महापालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील ड वर्ग महापालिका आणि नगरपालिकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जारी केले आहेत.यामध्ये जिल्ह्यातील अहिल्यानगर महापालिकेचा समावेश आहे. याशिवाय संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड, देवळाली प्रवरा व राहुरी अकरा नगरपालिका व नेवासा नगरपंचायतीचा समावेश आहे.
(संग्रहित दृश्य.)
कसा राहील कार्यक्रम ?
अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रभागरना करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रभागरचनेचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त यांनी प्रारुप प्रभागरचना तयार करुन जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे, जिल्हाधिकारी यांनी सदर प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत.आयोगाने मान्यता दिल्यास महापालिका आयुक्त सदर प्रारुप प्रभागरचना प्रसिध्द करणार आहेत. यावर दाखल झालेल्या हरकतींची जिल्हाधिकारी सुनावणी घेणार आहेत. सुनावणीनंतर जिल्हाधिकारी अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहेत. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर महापालिका आयुक्त अंतिम प्रभागरचना प्रसिध्द करणार आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायतींची प्रभागरचनेचे अधिकार देखील जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. संबंधित नगरपालिकांचे मुख्याधिकारी हे प्रारुप प्रभागरचना तयार करुन जिल्हाधिकारी यांना सादर करणार आहेत. याला मान्यता मिळावी यासाठी जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहेत. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर मुख्याधिकारी प्रारुप प्रभागरचना प्रसिध्द करणार आहेत. यावर दाखल सुनावणी देखील जिल्हाधिकारी घेणार आहेत. अंतिम प्रभागरचना मुख्याधिकारी प्रसिध्द करणार आहेत. लोकसंख्येच्या आधारावर एकूण सदस्यसंख्या निश्चित केली जाणार आहे. एका प्रभागातून एक सदस्य निश्चित केला जाणार आहे. नगरपंचायतीसाठी १७ सदस्यसंख्या निश्चित केली आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी एकूण लोकसंख्या भागिले महापालिकेची एकूण सदस्यसंख्या गुणिले संबंधित प्रभागातून निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या या सूत्रानुसार प्रभाग तयार केले जाणार आहे. मंगळवारी (दि.१०) जारी केलेल्या कार्यक्रमात तारीख निश्चित केलेली नाही. येत्या काही दिवसांत तारखेचा कार्यक्रम येण्याची शक्यता आहे. शासनाने प्रभागरचना करताना कोणत्या पध्दतीचा वापर करावयाचा याबाबत जिल्हा प्रशासनासाठी विविध मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.