Reading:आता आकाचा कार्यक्रम झाला आहे ; जिल्ह्यातील राख सम्राटांची घरे राज्यपाल महोदयांच्या बंगल्यापेक्षाही मोठे,इनकमटॅक्स वाल्यांनी जरा परळीकडे लक्ष दिलं पाहिजे. – आमदार सुरेश धस
आता आकाचा कार्यक्रम झाला आहे ; जिल्ह्यातील राख सम्राटांची घरे राज्यपाल महोदयांच्या बंगल्यापेक्षाही मोठे,इनकमटॅक्स वाल्यांनी जरा परळीकडे लक्ष दिलं पाहिजे. – आमदार सुरेश धस
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक देखील केलं आहे. मात्र, अद्यापही एक आरोपी फरार आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेचा तपास सीआयडी आणि एसआयटी व न्यायालयीन चौकशीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ही घटना घडल्यानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी तसेच वाल्मिक कराडचं कनेक्शन, खंडणीचे प्रकार या सगळ्याला वाचा फोडण्याचं काम भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केलं. यानंतर आज आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आणखी एक मोठा इशारा दिला आहे. आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचा बाकी आहे, बीडमध्ये अजून वाळूवाले आणि राखेवाले राहिलेत, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
(संग्रहित दृश्य.)
कृष्णा अंधाळे हा करून करून काय करणार ?
धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत आरोपी कृष्णा अंधाळे हा पुरावे नष्ट करू शकतो असा संशय व्यक्त केला होता. धनंजय देशमुख यांच्या या विधानावर बोलताना सुरेश धस म्हणाले की धनंजय देशमुख हे काही चुकीचं बोलत आहेत असं नाही. कृष्णा अंधाळे हा करून करून काय करणार ? कृष्णा अंधाळे हा काय पुरावे नष्ट करणार ? पुरावे नष्ट करण्याचं काम तर विष्णु चाटेनी केलं. विष्णु चाटे त्याचं आणि आकाचं बोलणं पोलिसांसमोर जाऊ नये म्हणून त्याने प्रयत्न केला असावा. त्याने त्याचा मोबाईल पाण्यात टाकला असावा. मात्र, याबाबत पोलीस योग्य तो तपास करतील, असं आमदार धस यांनी म्हटलं आहे.
(संग्रहित दृश्य.)
आता आकाचा कार्यक्रम झालेला आहे, पण…..
बीड जिल्ह्यातील राख सम्राटांची घरे राज्यपाल महोदयांच्या बंगल्यापेक्षाही मोठे आहेत. खरं तर इनकम टॅक्स वाल्यांनी जरा परळीकडे लक्ष दिलं पाहिजे. आता आकाचा कार्यक्रम झालेला आहे, पण आकाच्या खालचे काही छोटे आका ते देखील शोधले पाहिजेत, असा आरोप देखील धस यांनी केला आहे. एका पोलिसाकडे १०० हायवा आणि १५ जेसीबी असल्याचं विधान सुरेश धस यांनी केलं होतं. मात्र त्यानंतर पोलिसाने आपल्याकडे एक साध टायर देखील नाही असं म्हटलं होतं. यानंतर आता सुरेश धस यांनी म्हटलं की, मी जे विधान केलं होतं, त्यावर अजूनही मी ठाम आहे. जर मी बोललो ते खोटं असेल तर त्या ठिकाणी जाऊन पाहा. तो एक पोलीस गेल्या १५ वर्षांपासून परळी तालुक्यात कसा ? एवढंच नाही तर खोट्या नोटांमध्ये देखील तो आहे. त्या पोलीस हवालदाराचा तपास होऊन जाऊद्या. ईडीने संपत्तीची चौकशी केली पाहिजे, असं सुरेश धस यांनी म्हटलं. तसेच बीडमध्ये अजून वाळूवाले आणि राखेवाले राहिले आहेत. अजून बऱ्याच जणांवर मकोका लागायचा आहे. आजही कोट्यवधी रुपयांचे राखेचे ढिगारे पडले आहेत. आजही रात्री ९ नंतर राखेच्या गाड्या सुरु आहेत. याकडेही बीडच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यायला पाहिजे असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.