सहकाराचा जिल्हा म्हणून हा अहमदनगर जिल्हा ओळखला जातो. सहकार क्षेत्रावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल, तर महायुतीला साथ द्या. असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केले आहे. नेवासा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विठ्ठल लंघे यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे नगरमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते. घराणेशाहीला तिलांजली देऊन परिवर्तन घडवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. या मतदारसंघातील दादागिरी, दडपशाही आणि भ्रष्टाचार मोडून काढायचा निर्धार करून मैदानात उतरावे. ज्यांनी शनी शिंगणापूर मंदिरात भ्रष्टाचार केला होता. त्यांना जनता आता सोडणार नाही. शनी देवाचा कोपच यंदा नेवासामध्ये परिवर्तन घडवणार असेही त्यांनी म्हटले. नेवासा तालुक्यातील ९७ हजार ७६८ बहिणींच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत. आम्ही घेणारे नव्हे तर देणारे असून आता माझ्या लाकड्या बहिणी महालक्ष्मी नव्हे तर कडकलक्ष्मी बनून तुम्हाला तुमची जागा दाखवतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.