TIMES OF NAGAR
राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ असली तरी त्यांच्या कुटुंबातील वाद विधानसभा निवडणुकीनंतर प्रकर्षाने समोर येऊ लागले असून आज माढा येथे त्यांचे ज्येष्ठ बंधू व सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत तानाजी सावंत यांचे नावच नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अचानक या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आज माढा येथे शिवाजीराव सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत यांच्या राजवी ऑइल इंडस्ट्रीचे भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत असून यानंतर शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे. या कार्यक्रमात माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे नाव नसल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. वास्तविक विधानसभा निवडणुकीच्या वेळेला प्राध्यापक शिवाजी सावंत हे सोलापूर मध्यमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. यासाठी त्यांनी अनेक महिने या मतदारसंघात कामही केले होते. यावेळी त्यांची उमेदवारी ऐन वेळेला रद्द झाली यातूनच या वादाला सुरुवात झाल्याचे बोलले जाते. शिवाजी सावंत आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील जुने मित्र असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दोघांनाही एकाच वेळेला जिल्हाप्रमुख केले होते. गेल्या काही दिवसांपासून शिवाजी सावंत आणि त्यांचे धाकटे बंधू आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यामध्ये संबंध बिघडल्याची चर्चा होती. मात्र आज पक्षाच्या कार्यक्रमातच तानाजी सावंत नसल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. आजही एकनाथ शिंदे हे शिवाजी सावंत यांच्या अतिशय निकट संबंधात असून नेहमीच ते सोलापूर जिल्ह्यात आल्यावर शिवाजी सावंत यांना भेटल्याशिवाय जात नाहीत.
(संग्रहित दृश्य.)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा माढा दौरा रद्द…
दरम्यान राज्यात दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू असताना गेले तीन दिवस आपल्या शेतात रमलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज माढा येथे शिवसेनेच्या मेळाव्यासाठी येणार होते. तसा त्यांचा कार्यक्रमही आला होता. मात्र अचानक ऐन वेळेला उपमुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याचा मेसेज आल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. मात्र थोड्यावेळापूर्वी उपमुख्यमंत्री कार्यालयातून आजचा माढा दौरा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अचानक उपमुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केल्याने यामागे नेमके करणार काय? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी येणार नसले तरी त्यांच्या ऐवजी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि शंभुराई देसाई मात्र माढ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.