TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | CRIME NEWS | A MIGRANT WAS TIED TO A TREE AND BEATEN | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – सारसनगर येथील औसरकर मळ्यात एका परप्रांतीय व्यक्तीला चोर असल्याच्या संशयावरून झाडाला बांधून व लटकावून अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी (२५ जून) रोजी सायंकाळी घडली असून बुधवारी (२६ जून) रोजी व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हा प्रकार समोर आला आहे. राजू हिरा घोष (वय ३२, रा. शंकरकला, जि. मालदा, राज्य पश्चिम बंगाल) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पाच जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
झाडाला बांधून लाकडी दांडक्याने मारहाण…
पोलीस अंमलदार पांडुरंग आश्रुबा बारगजे यांनी फिर्याद दिली आहे. किरण भगवान औसरकर, बाबासाहेब भगवान पुंड, विशाल किसन इवळे, ऋषिकेश आजिनाथ जायभाय, ऋतिक बाबासाहेब पुंड (सर्व रा. औसरकर मळा, सारसनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यातील बाबासाहेब पुंड वगळता चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने २९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घोष हा चोर असल्याच्या संशयावरून मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याला पकडण्यात आले होते. त्याला झाडाला बांधून व लटकावून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. जखमी घोष याची प्रकृती स्थिर असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. अटकेतील चारही संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. मारहाण करताना वापरलेले हत्यार, दोरी हस्तगत करायची आहे, आणखी कुणाचा सहभाग आहे याची चौकशी करायची आहे, त्यासाठी सात दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी तपासी अधिकार्यांनी केली आहे. न्यायालयाने चौघांना २९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.