भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या परिस्थितीबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की, भारताची आज सकाळी झालेली लष्करी कारवाई दुर्दैवी आहे. सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेत आहोत. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश आहेत आणि चीनचेही शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीने विचार करावा, संयम बाळगावा, शांतता राखावी आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आम्ही दोघांनाही आवाहन करतो. असेही चीन म्हणाला ज्या क्षणांची प्रतीक्षा तमाम भारतीय करत होते अखेर तो क्षण आलाच. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे (दि.२२) एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सेनेनं बदला घेतला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली आहे. भारतीय वायुदलानं आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. मात्र हे केवळ एका मोहिमेचे नाव नसून या नावामागे अनेक अर्थ दडल्याचे सांगितले जातंय.