अॅमेझॉन चे पार्सल आले आणि पार्सल खोलताच त्यातून चक्क जिवंत कोब्रा बाहेर, एका दाम्पत्यासोबत घडली धक्कादायक घटना….
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | BANGALORE | AMAZON COMPANY | A SNAKE HAS APPEARED IN THE PARCEL OF AMAZON COMPANY ORDERED BY A COUPLE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अॅमेझॉन ही प्रतिथयश कंपनी त्यांच्या सेवेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र बंगळुरुत राहणाऱ्या एका दाम्पत्याला भीतीदायक अनुभव आला आहे. त्यांचे अॅमेझॉन चे पार्सल आले आणि त्यात चक्क जिवंत साप बाहेर आला. हा साप पाहून दाम्पत्याची भीतीने गाळण उडाली आहे. ज्या दाम्पत्याने पार्सल मागवले होते ते दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांनी एक्स बॉक्स कंट्रोलर ऑनलाईन ऑर्डर केला होता. मात्र जेव्हा त्याचा बॉक्स आला तेव्हा त्यात चक्क साप निघाला आहे. कोब्रा या जातीचा हा साप पाहून या दोघांची पाचावर धारण बसली होती. हा विषारी साप पॅकिंगच्या टेपमध्ये अडकला होता त्यामुळे सुदैवाने या दोघांना काहीही इजा झाली नाही.
स्त्रोत सोशल मिडिया
अॅमेझॉनच्या पार्सल बॉक्समध्ये जिवंत साप….
या धक्कादायक प्रकारानंतर बंगळुरुतल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर कपलने याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी हे म्हटले आहे की आम्ही अॅमेझॉनवरुन एक्सबॉक्स कंट्रोलर मागवला होता. त्या बॉक्समध्ये जिवंत साप होता. अॅमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयने हा बॉक्स आमच्या हातात दिला नाही तर तो आमच्या घराबाहेर हा बॉक्स ठेवून गेला होता. आम्ही बंगळुरुतल्या सराजपूर रोड या ठिकाणी असलेल्या इमारतीत राहतो. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तसंच प्रत्यक्षदर्शीही आहेत ज्यांनी आम्हाला याबाबत सांगितले असे या दाम्पत्याने व्हिडीओत म्हटले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने सांगितले, सुदैवाने तो साप पॅकिंग टेपमध्ये अडकला होता. त्यामुळे त्याने आम्हाला काहीही इजा केली नाही. आम्ही याबाबत कंपनीला म्हणजेच अॅमेझॉनला संपर्क केला. त्यांच्या ग्राहक सेवेच्या अधिकाऱ्यांनी दोन तास तुम्हीच या प्रसंगाशी दोन हात करा असे सांगितले. त्यामुळे साप असलेला बॉक्स समोर ठेवत त्यावर लक्ष ठेवण्याची वेळ आमच्यावर अर्ध्या रात्री पर्यंत आली. आम्ही जे पैसे दिले होते ते आम्हाला कंपनीने परत दिले आहेत. मात्र विषरी साप आल्याचा जो धोका होता त्याचे काय ? साप कुणाला चावला असता तर जीवही जाऊ शकला असता. अॅमेझॉन या कंपनीने सपशेल निष्काळजीपणा केला आहे. त्यामुळेच ही घटना घडली आहे. या घटनेसाठी कोण जबाबदार आहे ?असाही प्रश्न या महिलेने विचारला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
अॅमेझॉन कंपनीने व्यक्त केला खेद….
इंजिनिअर दाम्पत्याने जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यावर अॅमेझॉन कंपनीने खेद व्यक्त केला आहे. ग्राहकांना जो त्रास सहन करावा लागला त्यामुळे आम्हाला वाईट वाटले आहे. आमची टीम लवकरच तुम्हाला याबाबत माहिती देऊ असे कंपनीने म्हटले आहे. यानंतर इंजिनिअर दाम्पत्याने म्हटले आहे की आम्हाला कंपनीने सगळे पैसे परत केले आहेत. मात्र अधिकृतरित्या त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली नाही किंवा जे काही घडले त्याची नुकसान भरपाई दिलेली नाही. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. भविष्यातही यात काही सुधारणा होईल असे वाटत नाही असेही या दोघांनी म्हटले आहे.