सरकारी नोकरी असलेल्या पगारी व्यक्तींनी आचारसंहितेचा भंग करू नये, अशा स्पष्ट सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या असताना देखील श्रीगोंदा तालुक्यातील दोन शिक्षक निवडणूक कामात लुडबुड करत असल्याने आता त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आला आहे. त्यामुळे या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. श्रीगोंदा येथील एका शिक्षण संस्थेवर ते काम करत असून सचिन पाचपुते यांनी याबाबत तक्रार केली आहे.
(संग्रहित दृश्य.)
सरकारी नोकरी असलेल्या व्यक्तींनी आचारसंहितेचा भंग करू नये.
याबाबत अधिक माहिती अशी कि श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीश सर्यवंशी व चिखली येथील माध्यमिक शिक्षक रामदास झेंडे या दोघांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. दोन्ही शिक्षक हे नागवडे यांचे कार्यकर्ते असल्याची तक्रार सचिन पाचपुते यांनी केली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारी नुसार श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश सूर्यवंशी व चिखली येथील माध्यमिक शिक्षक रामदास झेंडे हे सरकारी नोकरी करत असताना सुद्धा अनुराधा राजेंद्र नागवडे यांचा एबी फॉर्म घेण्यासाठी मुंबई येथे प्रत्यक्ष उपस्थित होते. त्याबाबतचा फोटोसह पुरावा तक्रारदार सचिन पाचपुते यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे. डॉ. सतीश सूर्यवंशी व रामदास झेंडे यांना आचारसंहितेचा भंग केल्याने त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी सचिन पाचपुते यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. पाचपुते यांच्या तक्रारीची दखल घेत सहा. निवडणूक अधिकारी यांनी डॉ. सतीश सूर्यवंशी आणि रामदास झेंडे यांच्याकडून खुलासे मागितलेले आहेत. ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था, श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी केला जात आहे. सरकारी नोकरी असलेल्या पगारी व्यक्तींनी आचारसंहितेचा भंग करू नये अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. दरम्यान आता शिक्षकांविरुद्ध थेट तक्रार करण्यात आल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अनेक लपून छपून प्रचार करणारे आता पुढे काय करायचे असा सवाल उपस्थित करत आहेत.