महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातच पारनेर विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा जिल्ह्याभरात रंगली आहे. कारण या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीतून राष्ट्रवादीकडून काशिनाथ दाते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राणी दाते यांच्या उमेदवारीवरून निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला आहे.
(संग्रहित दृश्य.)
घराणेशाहीवरून टीका करणाऱ्यांनी घरातच उमेदवारी…
पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन निलेश लंके यांनी अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत लढवली होती. त्यांच्या लढत भाजपच्या सुजय विखे पाटील यांच्याशी झाली होती. या निवडणुकीत प्रचार दरम्यान निलेश लंके यांनी सुजय विखे यांच्यावर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका जोरदार हल्लाबोल केला होता. आता निलेश लंके यांच्या पत्नीला पारनेरमधून विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे. यानंतर सुजय विखे पाटलांनी निलेश लंकेंवर टीका केलीय. लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात गरीब, घराणेशाहीबाबत प्रचार केला गेला होता. मग आता पारनेर विधानसभा निवडणुकीत काय सुरू आहे? घराणेशाहीवरून टीका करणाऱ्यांनी घरातच उमेदवारी मिळवली, असं म्हणत भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी निलेश लंके यांच्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत पारनेर आणि अहिल्यानगरच्या जनतेला आपली चूक कळाली आहे. मविआ उमेदवाराने लोकसभेत मित्र पक्ष आणि जनतेला दिलेली आश्वासन पाळली नाहीत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे इथली जनता पुन्हा चूक करणार नाही. या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन नक्की होईल, असा विश्वासही सुजय विखेंनी व्यक्त केला आहे. महायुतीच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी शिर्डी येथे सभा घेतली होती. मात्र त्यांच्या सभेमुळे कोणताही परिणाम होणार नाही. स्वातंत्र्यानंतर त्या पहिल्यांदा नगर जिल्ह्यात आल्या आहेत. उलट त्यांच्या भाषणामुळे आम्हाला लीड मिळेल, अशी बोचरी टीका सुजय विखे पाटील यांनी प्रियांका गांधी यांच्यावर केली आहे.