Sujay Vikhe Patil : बिबट्यांच्या हल्ल्यात पशुधन सोबतच मानवावर हल्ल्याच्या अनेक घटना राज्यभरात नेहमीच घडत असतात. गेल्या काही दिवसात बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढला असून बिबट्याच्या हल्ल्यात अनेक निष्पाप बालकांचा देखील मृत्यू झाला आहे. याबाबत आता जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय माजी खासदार सुजय विखे यांनी घेतला आहे. बिबट्या माणसांना मारू शकतो मात्र बिबट्याला मारण्याची परवानगी नाही. या संदर्भात नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती सुजय विखे यांनी दिली आहे. वनविभागाकडून माहिती घेत असून मी देखील यावर अभ्यास करत आहे. वकिलांचा सल्ला घेऊन लवकरच न्यायालयात जाणार असे देखील सुजय विखे यांनी स्पष्ट केले आहे. सुजय विखे माध्यमांशी बोलत होते, संगमनेर आणि राहाता तालुक्यात अनेकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. वनविभागाकडून मी सर्व माहिती घेत आहे. माझा देखील यावर अभ्यास आता पूर्ण होत आला आहे. या संदर्भात लवकरच मी जनहित याचिका दाखल करणार आहे.माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, यासाठी जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
(संग्रहित दृश्य.)
जो भक्त दर्शन रांगेत असेल त्यालाच आता कुपन मिळेल.
शिर्डी संस्थानच्या वतीने सुरू असलेल्या अन्नछत्राच्या मोफत जेवणासाठी आता कुपन बंधनकारक करण्यात आले आहे. कुपन असेल तरच भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येणार आहे. याबाबत विचारले असता सुजय विखे म्हणाले की, जो भक्त दर्शन रांगेत असेल त्यालाच आता कुपन मिळेल. संस्थानने घेतलेल्या निर्णयाचा आनंद वाटतो. आमचा विरोध साई भक्तांना कधीच नव्हता. पुढील आठवड्यापर्यंत रोज जेवणारे साईभक्त व इतर जेवणारे यातील आकडे देखील आता समोर येतील. वेगवेगळ्या कारणांनी शिर्डीत येऊन स्थायिक झालेले आकडे आता समोर येतील. कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वेळेत केलेला बदल देखील स्वागत करण्यासारखा आहे. आगामी काळात कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुरू केली शकते का ? यावर विचार करावा लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
(संग्रहित दृश्य.)
आठवडाभरात अतिक्रमण मुक्त व प्रशासन युक्त शिर्डी दिसेल.
शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंत पोलीस प्रशासन सतर्क झाल्याचे पाहायला मिळते. शहरातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू करत गुरुवारी १०० पेक्षा जास्त व्यक्तींची धरपकड करून त्यांची चौकशी केली आहे. याबाबत विचारले असता सुजय विखे म्हणाले की, पोलिसांनी कारवाई सुरू केली याचा आनंद वाटतो. पोलीस निरीक्षकाची बदली केली, आता नवीन गाड्या देखील पोलिसांना मिळणार आहेत. देर से आये पण दुरुस्त आये, असं मला वाटतं. आठवडाभरात अतिक्रमण मुक्त व प्रशासन युक्त शिर्डी दिसेल, असा मला विश्वास आहे. लवकरच मंदिरासमोर महामार्गावर मोठ्या व अवजड वाहनांना प्रवेश बंदीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. काहींचं आर्थिक नुकसान होईल. मात्र समाजहित महत्वाचे असल्याने याबाबत देखील निर्णय होईल, असे देखील विखे पाटील यांनी म्हंटले आहे.