President of France – Emmanuel Macron / U.S. President – Donald Trump : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. या निर्णयाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. यादरम्यान फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांबद्दल चर्चा करण्यासाठी ताबडतोब आपत्कालिन बैठक बोलावली आहे. युरोपियन युनियनच्या अधिकार्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. ही बैठक आज सोमवारी (दि.१७ ) पॅरिस येथे होणार असल्याची माहिती पोलिश परराष्ट्र मंत्री रोडास्लाव सिकोर्स्की यांनी शनिवारी म्युनिक सुरक्षा परिषदेवेळी दिली होती. तसेच दोन युरोपियन यूनियन अधिकार्यांनी देखील पॉलिटिकोशी बोलताना याला पुष्टी दिली आहे. राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी आमच्या नेत्यांना पॅरिसला बोलावले आहे याचा मला खूप आनंद आहे, असे सिकोर्स्की म्हणाले. यावेळी त्यांनी ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या निर्णयांवर अत्यंत गंभीरपणे चर्चा केली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एका जबाबदार माध्यमाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. यावेळी सिकोर्स्की यांनी ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाची तुलना रझवेदका बोयम किंवा युद्धाच्या माध्यमातून केली जाणारी टेहाळणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाच्या लष्करी रणनीतीशी केली आहे. ज्यामध्ये नेता आपली भूमिका जुळवून घेण्याआधी लोकांच्या प्रतिक्रिया तपासण्याकरिता आपल्या मर्यादा ओलांडतो. तुम्ही पुढे रेटत राहता आणि काय होतं ते पाहाता आणि नंतर त्यानुसार तुमची भूमिका बदलता. आता आपण प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे असे सिकोर्स्की यांनी म्हंटले आहे.
(स्त्रोत.सोशल मिडिया.)
तुमचे स्वागत करणे हा फ्रेंच लोकांसाठी मोठा सन्मान…….
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मात्र सातत्याने अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध टिकवून ठेवले आहेत. नोव्हेंबरमध्ये ट्रम्प पुन्हा निवडून आल्यानंतर फ्रान्सच्या अध्यक्षांनी पुन्हा ट्रम्प यांना सहकार्य करण्याची तयारी दर्शविली होती. चार वर्ष केलं तसं आम्ही पुन्हा तुमच्याबरोबर काम करण्यासाठी तयार आहोत. तुमचा आणि माझा विश्वास, आदर आणि महत्त्वकाक्षेने आपण अधिक शांतता आणि समृद्धीसाठी काम करू, अशी पोस्ट मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांच्या नोट्रे डेम कॅथेड्रलच्या उद्घाटनासाठीच्या डिसेंबरमधील पॅरिस दौऱ्यावेळी एक्सवर केली होती. पाच वर्षांनंतर तुमचे स्वागत करणे हा फ्रेंच लोकांसाठी मोठा सन्मान आहे,असेही मॅक्रॉन ट्रम्प यांना भेटीदरम्यान म्हणाले होते.