अ नगर : एका जखमी व्यक्तीला दुचाकीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात घेवून आलेल्या दोघांनी त्यास रुग्णालयाच्या पोर्चमध्ये टाकून तेथून धूम ठोकली. ही घटना लक्षात आल्यावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीस उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले होते. हा प्रकार (दि.२०) एप्रिलला पहाटे १.४५ च्या सुमारास घडला असून त्या व्यक्तीला रुग्णालयाच्या पोर्चमध्ये टाकून पसार झालेले दोघे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या मोटारसायकलवर एक अंदाजे ३८ वर्षीय अनोळखी इसमास २० एप्रिलला पहाटे १.४५ च्या सुमारास जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र रुग्णालयाच्या पोर्चमध्ये त्याला टाकून ते संशयास्पदरित्या तेथून तातडीने निघून गेले. काही वेळात ही बाब तेथील सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आली. त्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगितले. कर्मचाऱ्यांनी सदर व्यक्तीला उपचारासाठी आतमध्ये नेले. तेथे असलेले मेडिकल ऑफिसर डॉ. आर. के. कुलकर्णी यांनी त्यास तपासले असता तो व्यक्ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचे समोर आले. ही बाब त्यांनी पो.हे.कॉ. दीपक जाधव यांना सांगितली. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार गंगावणे हे करीत आहेत. मयत व्यक्तीचे वर्णन चेहरा उभट रंग काळा सावळा, उंची ५ फुट ६ इंच, अंगाने सडपातळ, अंगात फिकट पिस्ता रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची हाफ नाईट पेंन्ट, दाढी काळी पांढरी वाढलेली पांढऱ्या रंगाचे बनियन घातलेले, डोक्याचे केस वाढलेले असे मृत व्यक्तीचे वर्णन आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या टीबी वॉर्डच्या पार्किंगमध्येही २० एप्रिल रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास एक अंदाजे ६० वर्षीय अनोळखी इसम बेशुद्धावस्थेत मिळून आला. त्यास रुग्णालयात दाखल करून मेडिकल ऑफिसर डॉ. कोल्हे यांनी तपासले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे समोर आले. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी डॉ. कोल्हे यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद केली असून,अधिक तपास पोलीस हवालदार सुनील आंधळे करीत आहे.