TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सोमवार (दि.२६ फेब्रुवारी) अहमदनगर दौरा केला. अहमदनगर शहरात गडकरींच्या हस्ते अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन झाले.स्पष्ट आणि थेट बोलणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये गडकरींचे नाव प्रथम क्रमांकावर घेतले जाते.विकासाचे स्वप्न असलेले गडकरी हे २०१४ पासून केंद्रात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. गडकरींच्या काळात रस्ते आणि वाहतुकीचे मोठे प्रश्न मार्गी लागले आहेत. मात्र स्पष्ट आणि थेट बोलण्याच्या स्वभावामुळे चमचेगिरी करणाऱ्या अनेक स्वयंघोषित नेत्यांना गडकरींचा राग असल्याचे गडकरी मिश्कील अंदाजात सांगत असतात.
फलकावरील नेत्यांनी देखील फिरवली पाठ
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अहमदनगरचा दौरा केला. जवळपास चार वाजताच्या सुमारास गडकरींचे पोलीस मुख्यालयाच्या मैदानात आगमन झाले. केंद्रीय मंत्री येणार आणि प्रोटोकॉल पाळावाच लागेल यासाठी जिल्हाधिकारी,आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, तहसीलदार आणि डजनभर अधिकारी गडकरींच्या स्वागतासाठी तैनात होते. गडकरींचे आगमन होताच अधिकाऱ्यांनी गडकरींचे स्वागत केले. औपचारिकता म्हणून अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य गडकरींच्या नजरेत पार पाडले. गडकरी एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनाला रवाना होताच या अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा आपआपल्या कार्यालयाकडे वळवला.
गडकरींच्या स्वागतासाठी बोटांवर मोजण्या इतकेच लोक.
गडकरी यांचा अहमदनगर दौरा झाला यावेळी गडकरींच्या स्वागतासाठी भाजपचे बोटांवर मोजण्या इतकेच नेते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ आणि मुरब्बी राजकारणी नेते आहेत. अहमदनगर जिल्ह्यात देखील भाजपची मोठी ताकत आहे. विशेष म्हणजे गडकरींचे आगमन हे नगर दक्षिण मतदार संघात झाले.या दक्षिण मतदार संघात देखील भाजपचाच खासदार आहे. मात्र गडकरींच्या स्वागतासाठी बोटांवर मोजता येईल एवढेच नेते उपस्थित होते.




