तो पोलीस मित्र कोणत्या संघटनेचा पदाधिकारी,कोणाच्या संपर्कात ?
नगर शहरासह अनेक बायपास रस्त्यांवर खाकी ड्रेस घालून शर्ट वर ट्रॅक सूट घालून हुबेहूब पोलीसांसारखे दिसणारे लोक आपण पाहतो. ती लोक गाड्या अडवतात,पैशांची मागणी करतात. ही लोक पोलीस असल्याचे आपल्याला भासवतात.मात्र ही लोक पोलीसच आहेत असा गैरसमज अनेकांचा होतो. खूप नागरिक यांना घाबरतात,वेळप्रसंगी पैसे देऊन निघून जातात. परंतु खाकी ड्रेस घालून उभा असलेला व्यक्ती हा पोलीस नसतो तर हा पोलीस मित्र असतो.पोलिसांसारखा वेश परिधान करून हे पोलिस मित्र वाहन चालकांकडून पैसे उकळण्याचे प्रयत्न करत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणातून नगर तालुक्यातील अरणगाव येथे एका पोलिस मित्राला ग्रामस्थांनी चांगलाच प्रसाद दिला होता.अशाच प्रकारामुळे नगर तालुक्यातील वाळुंज बायपास येथून मागील महिन्यात दोन पोलिस मित्रांना पोलिसांनी अटक केली होती.पण पोलिसांनी या पोलीस मित्रांना समज देऊन नंतर सोडून दिले होते.
जनावरांचे लोकेशन त्या पोलीस मित्राच्या फोनवर कोण पाठवत होते.?
नगर तालुक्यात या पोलिस मित्रांची चांगलीच चर्चा रंगली होती. जनावरे घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाकडून दमदाटी करून पैसे उकळण्याचा प्रकार एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या समोर घडला होता. त्याचा व्हिडिओ देखील पोलिस निरीक्षकाकडे असल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर या दोन पोलिस मित्रांना संबंधित पोलिस ठाण्यात दिवसभर बसून ठेवण्यात आले होते.पोलिसांनी या पोलीस मित्राचा मोबाईल फोन तपासाला असता त्याला जनावरे वाहून नेणाऱ्या टेम्पोचे लोकेशन मिळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.टेम्पोमध्ये असलेले जनावरे वाहून नेणारा टेम्पो कुठल्याही कत्तलीसाठी किंवा जनावरांना इजा होईल, अशा प्रकारे नेण्यात येत नव्हता. तो टेम्पो एका शेतकऱ्याचा आहे, असे सांगूनही त्याच्याकडून पैसे उकळण्याचा अट्टहास या पोलिस मित्राने केला होता.असे पोलिसांच्या माहितीनुसार समोर आले होते.एवढ्या मोठ्या प्रमाणात घडलेल्या प्रकारांनतर त्या पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करणे बंधनकारक असतानाही,काही नेते मंडळींच्या मध्यस्थीमुळे हे प्रकरण मिटले होते. यातील एक पोलिस मित्र एका संघटनेचा सदस्य व संघटनेच्या महत्वाच्या लोकांच्या संपर्कात होता.त्यामुळे पोलिस मित्रांना फक्त समज देऊन सोडण्यात आले होते.
पार्टीत मग्न.
शहरात एका अधिकाऱ्याच्या वाढदिवसाची मोठी जंगी पार्टी करण्यात आली होती. आजी-माजी सरपंचांनी उपस्थित सर्वच लोकांच्या पाहुणचाराची जबाबदारी घेतली होती.कोंबड्याचा,बोकड्यांचा बळी देऊन मस्त नॉनव्हेज पार्टी रंगली होती अशी प्राथमिक माहिती आहे.एवढी मोठी पार्टी झाली या पार्टीला पोलीस ठाण्याचे सर्वच कर्मचारी नटून-थटून हाजर होते. भर दिवसा झालेल्या या जंगी पार्टीमध्ये सहभागी सर्वच कर्मचारी त्या दिवशी सुट्टीवर होते का, जर सुट्टीवर नव्हते तर मग ड्युटी सोडून ते पार्टीत मजा करत होते का असा सवाल नगरकर करत असल्याचे समजते. एवढ्या मोठ्या जंगी पार्टीचे आयोजन शहरात झाले.या पार्टीच्या काही विशेष नियोजनासाठी कर्मचाऱ्यांनी आपापसात निधी जमा केला (कॉन्ट्री) याची माहिती वरिष्ठाना नाही का,कि वरिष्ठ मुद्दाम या विषयाला कानडोळा करत आहेत असा सवाल सध्या नगरकर उपस्थित करत आहेत.काही दिवसांपूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परीषेत्र,नाशिक बी.जी.शेखर नगर दौऱ्यावर होते. अनेक सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती लावत.बदली झालेल्या पोलिसांना ताबडतोब कार्यमुक्त करून बदली झालेल्या ठिकाणी हजर करण्याच्या सूचना देऊन गेले. मात्र त्यांनी या ऐशो आरामाच्या पार्टीबद्दल एकही भाष्य केले नाही याची नाराजी सध्या नगरकरांमध्ये असल्याचे समजते.
काहीसा प्रकार मागील पंधरवड्यात पुन्हा तालुक्यातील दुसऱ्या पोलिस ठाण्यात पाहायला मिळाला, पोलिस मित्र वाहन चालकाकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, तेथील सहाय्यक पोलिस निरीक्षकाने त्यांना अटक केली होती.त्या प्रकरणात देखील मध्यस्थी होऊन त्या पोलिस मित्रांना सोडण्यात आले होते. पोलिस मित्रांकडून वारंवार कायद्यांचे उल्लंघन होत असतांना देखील त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर नगर शहरातही पोलिस कर्मचा-यांसोबत हे पोलिस मित्र कर्तव्य बजावताना दिसतात. त्या पोलीस मित्रांना पोलिसांसारखा दिसणारा गणवेश घालण्याची परवानगी कोणी दिली ? कोणत्या कायद्याच्या आधारे त्यांना हे अधिकार प्राप्त झाले आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.