विधानसभा निवडणुकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांत २८८ उमेदवारांनी ४१५ अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी १७० इच्छुकांनी २४१ अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान दाखल अर्जाची बुधवारी ३० ऑक्टोबर रोजी छाननी होणार असून त्यानंतर लगेच पात्र उमेदवारांची यादी त्या-त्या मतदारसंघात प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार असून सोमवारी ४ नोव्हेंबर एकाच दिवशी माघारीसाठी वेळ असून यामुळे राजकीय पक्ष व प्रमुख उमेदवारांसह अनेकांची तारांबळ होणार आहे.
(संग्रहित दृश्य.)
एबी फार्म न जोडता पक्षाच्या नावाने जोडलेले अर्ज बाद होणार.
शेवटच्या दिवशी दाखल अर्जात पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात,आमदार प्राजक्त तनपुरे,माजी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप,आमदार लहू कानडे,आमदार मोनिका राजळे, हेमंत ओगले, भाऊसाहेब कांबळे, सदाशिव लोखंडे, विठ्ठलराव लंघे, प्रताप ढाकणे, चंद्रशेखर घुले, राजेंद्र नागवडे, अमित भांगरे, संदीप वर्पे, अमोल खताळ, योगेश सूर्यवंशी, जनार्दन घोगरे, सुभाष साबळे, रुपाली भाकरे, शंकर यादव, संजय शेळके, महेंद्र शिंदे, काशीनाथ दाते, अभिषेक कळमकर या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. निवडणूक अर्जासोबत पक्षाचा एबी फार्म न जोडता पक्षाच्या नावाने जोडलेले अर्ज बाद होणार आहेत. त्यामुळे पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडलेला उमेदवार सध्या निवांत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात अनेक मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी इच्छुक असणार्यांना उमेदवार न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेले आहेत. ते शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहणार की ऐनवेळी माघार घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष करून नगर दक्षिणेतील श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, नगर शहरात शिवसेना ठाकरे,राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेसच्या अनेक नाराज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे दक्षिणेत महाविकास आघाडीत मोठी बंडखोरी होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.