नाशिक : विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाने थेट चार्टर्ड प्लेनने देवळाली आणि दिंडोरी मतदारसंघात एबी अर्ज पाठवून राष्ट्रवादी अजित पवार गटाला जोरदार धक्का दिला. देवळालीत राजश्री अहिरराव आणि दिंडोरीतून धनराज महाले यांनी शिंदे गटाच्यावतीने अर्ज दाखल करुन अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात बंडखोरीची भूमिका घेतली. आता नाशिकमध्ये चार्टर्ड प्लेनने आणलेल्या एबी फॉर्म प्रकरणी निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने दिंडोरी मतदारसंघात विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ आणि देवळालीत आमदार सरोज अहिरे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या उमेदवारांनी अर्ज दाखल करून प्रचारास सुरूवात केली असतानाच अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांना शिंदे गटाकडून धक्का दिला. महायुतीत जागा वाटपाच्या चर्चेत देवळाली आणि दिंडोरीच्या जागेवर शिंदे गटाने दावा केला होता. मात्र जागा वाटपात हे मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेल्यामुळे अखेरच्या दिवशी शिंदे गटाने मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली एबी फॉर्म चार्टर्ड प्लेनने नाशिकला पाठवले होते.
(संग्रहित दृश्य.)
निवडणूक आयोग काय निर्णय घेणार ?
आता निवडणूक आयोगाने याबाबत दखल घेतली आहे. जिल्हा निवडणूक शाखेला याबाबत विचारणा करण्यात आली आहे. अर्ज देण्यासाठी विमान कोणी आणले, त्यामध्ये कोण होते, कोणत्या उमेदवारांकरिता हे फॉर्म मागविण्यात आले व त्यासाठी किती खर्च आला, असे प्रश्न उपस्थित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आता यया प्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीला सुरुवात केली आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. आता प्रकरणी निवडणूक आयोग काय निर्णय घेणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.