चार वर्षाच्या चिमुरड्याला शेतात नेऊन त्याचा खून , तर नातवाच्या मृत्यूचे दु:ख सहन न झाल्याने आजोबांची आत्महत्या.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MAHARASHTRA POLICE | YAVATMAL | UMARKHED TALUKA | MURDER OF A FOUR-YEAR-OLD CHILD | CRIMINAL NEWS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील दिघडी येथे रविवारी गावातील उसाच्या शेतात एका चार वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह आढळला. त्याचवेळी मृत मुलाच्या आजोबांनी गळफास घेत आत्महत्या केली. गौरव गजानन शिंदे (४) असे नातवाचे, तर अवधूत राजाराम शिंदे (६२) असे मृत आजोबांचे नाव आहे. गौरवचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून, त्याचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या घटनेतील गुढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
गौरव शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता होता. मात्र तो गावातच खेळत असेल असे त्याच्या आई वडिलांना वाटले होते. त्यामुळे त्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. परंतु, संध्याकाळ होवूनही तो घरी परतला नाही. तेव्हा घाबरलेल्या कुटुंबीयांनी गौरवचा शोध सुरू केला होता. मात्र गौरव कुठेच सापडला नाही. तेव्हा कुटुंबीयांनी दिघडी शिवारातील शेतात त्याचा शोध सुरू केला. रात्री आठ वाजताच्या सुमारास गौरवचा मृतदेह एका उसाच्या शेतात आढळला. तेव्हा एकच खळबळ उडाली. चिमुरड्याचा मृतदेह बघून त्याच्या आई-वडिलांनी एकच टाहो फोडला. गौरवचा शोध घेण्यासाठी त्याचे आजोबा अवधूत शिंदे हे सुध्दा गावकऱ्यांसोबत फिरत होते. नातवाच्या मृत्यूचा धक्का अवधूत यांना बसला. रविवारी सकाळी अवधूत शिंदे यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह घरात आढळून आला. त्यांनी नातवाच्या मृत्यूचे दु:ख असह्य झाल्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.
(संग्रहित दृश्य.)
गौरवचा खून कोणी व का केला. ?
गौरवचा गळा आवळून खून झाल्याचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल सोमवारी डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे गौरवचा खून कोणी व का केला हे गुढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. गौरवच्या मृत्यूनंतर आजोबांनीही आत्महत्या केल्याने या खून प्रकरणात काही कौटुंबिक पार्श्वभूमीतर नाही ना ? या दृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गौरव घरातून बाहेर गेल्यानंतर बराच वेळ होवूनही तो परतला नव्हता, मात्र तरीही कुटुंबातील कोणीही सायंकाळपर्यंत दखल घेतली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तो उसाच्या शेताकडे कसा गेला, की कोणी त्याला तेथे नेवून त्याच्यावर अत्याचार करत त्याच्या खून केला, या दृष्टीनेही तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान गावकऱ्यांचे जबाब नोंदविले असून तपास जलदगतीने करण्यात येत आहे. उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देवून अधिकाऱ्यांना योग्य तपासाच्या सूचना दिल्या आहेत.