मिरारोड कनकिया येथील म्हाडा वसाहतीत एका महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सानिया (बदललेले नाव) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने खोल वार करण्यात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ही हत्या तिच्याच प्रियकराने केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अवघ्या चार तासांत छडा लावत मिरारोड पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक मेघना बुरांडे व त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत आरोपीला अटक केली आहे. शमशुद्दीन (वय २४, व्यवसाय,शेफ) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.
(संग्रहित दृश्य.)
लग्न करण्यासाठी तगादा लावला अन्
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सानिया (बदललेले नाव) व शमशुद्दीन यांच्यात काही काळापूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा व वाद वाढू लागले होते. प्रारंभिक चौकशीतून हेही समोर आले आहे की, नात्यातील तणावामुळे आरोपीने रागाच्या भरात तिच्या गळ्यावर वार करत हत्या केली. सानिया (बदललेले नाव) मृतदेह म्हाडा वसाहतीतील तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपासणी केली असून, संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. हा गुन्हा अत्यंत निर्घृण आणि अमानुष पद्धतीने करण्यात आला असून, स्थानिकांमध्येही या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सानिया (बदललेले नाव) ही आपले दोन भाऊ व प्रियकर समशुद्दीन याच्यासह मिरा रोड येथे राहात होती. समशुद्दीन हा एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होता व दोघांमध्ये गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. समशुद्दीनने लग्न करण्यासाठी सानिया (बदललेले नाव) तगादा लावला होता, परंतु आधी थोडे पैसे कमवू व नंतर लग्न करू, असे ती त्याला सांगत असे. काही दिवसांपासून दोघांमध्ये सातत्याने भांडणे होत होती. गुरुवारी देखील दोघांमध्ये भांडण झाले. त्यावेळी समशुद्दीनने तिचे दुसऱ्या कोणासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय व्यक्त केला. समशुद्दीनने रागाच्या भरामध्ये तो गावी जात असल्याचे सांगितले व तो घरातून निघून गेला, मात्र रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा घरी परतला, त्यावेळी सानिया (बदललेले नाव) दोन्ही भाऊ बाहेर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपीने तिची हत्या केली. त्यानंतर काही वेळाने भाऊ घरी परतले, त्यावेळी ती घरात गळा चिरलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. भावांनी समशुद्दीनला फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही, अशी माहिती एका मराठी वृत्तपत्राने दिली आहे.