Reading:दोन महिन्यात बलात्काऱ्याला फाशी दिली, मुख्यमंत्र्यांचा दावा, संजय राऊत म्हणाले महाराष्ट्रापासून तुम्ही काही लपवलं आहे का ? की भलत्याच माणसाला फाशी दिली आहे ?
दोन महिन्यात बलात्काऱ्याला फाशी दिली, मुख्यमंत्र्यांचा दावा, संजय राऊत म्हणाले महाराष्ट्रापासून तुम्ही काही लपवलं आहे का ? की भलत्याच माणसाला फाशी दिली आहे ?
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS NEWS | SANJAY RAUT | EKNATH SHINDE | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO
जळगाव : महाराष्ट्रात बलात्काराची अशीच घटना घडली, तो खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला दोन महिन्यांपूर्वी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रत्नागिरीत बोलताना केला होता. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंना धारेवर धरलं आहे. कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली, कोणत्या कोर्टात फास्ट ट्रॅक खटला चालला, कोणत्या न्यायालयानं आरोपीला शिक्षा ठोठावली आणि कोणत्या कारागृहात फाशी दिली, याचा तपशील जाहीर करण्याची मागणी संजय राऊत यांनी जळगाव पत्रकारांशी बोलत असतांना केली आहे.
(संग्रहित दृश्य.)
मुख्यमंत्री हा एक संशयी आत्मा आहे.
बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर शहरात झालेले जनआंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्री हा एक संशयी आत्मा आहे. त्यांचा अर्धा दिवस संशयकल्लोळ, जादूटोणा, मंत्रतंत्र, अंधश्रद्धा यात जातो. बदलापुरातील आंदोलन हाही त्यांना जादूटोणा वाटला असेल, कारण ते जादूटोणाप्रेमी आहेत. बदलापूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. लाखो लोक त्यांच्या मुलाच्या लोकसभा मतदारसंघात रस्त्यावर उतरले आहेत. ते म्हणतात की ठाणे हा त्यांचा जिल्हा आहे. मग तुम्ही किंवा तुमचा मुलगा आंदोलकांच्या भेटीला का नाही गेलात ? ते इतके भयग्रस्त होते का ? पीडित मुलीच्या गर्भवती आईची तक्रार पोलीस दहा तास घेत नव्हते, हे विरोधकांनी केलं का ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
(संग्रहित दृश्य.)
वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे दिली ?
संजय राऊत पुढे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांची एक क्लीप व्हायरल झाली आहे. ते म्हणाले की दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात अशीच एक घटना घडली होती. आम्ही ती फास्ट ट्रॅकवर चालवली आणि आरोपीला दोन महिन्यांपूर्वी फाशीची शिक्षा झाली. कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली, कोणत्या कोर्टात फास्ट ट्रॅक खटला चालवला, कोणत्या न्यायालयानं आरोपीला फासावर लटकवण्याची शिक्षा ठोठावली, कोणत्या कारागृहात आरोपीला फाशी दिली, याचा तपशील मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा, महाराष्ट्रापासून तुम्ही काही लपवलं आहे का ? की भलत्याच माणसाला फाशी दिली आहे ? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले. फाशीची जागा सांगावी, वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे दिली ? एखाद्या राज्यात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करायची असेल तर राजभवनात नोंद करावी लागते, राज्यपालांना आदेश काढावा लागतो. माझं राज्यपालांना आवाहन आहे की त्यांवी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य गांभीर्याने घ्यावं आणि परस्पर कोणाला फाशी दिलीय त्याची चौकशी करावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.
(संग्रहित दृश्य.)
महाराष्ट्राला मूर्ख समजला आहात का ?
तुमच्याकडे कुठली नोंद असेल, तर महाराष्ट्रासमोर आणावी. राज्याचे मुख्यमंत्री ‘येक नंबर’चे खोटारडे आहेत, गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत, महाराष्ट्राला मूर्ख समजला आहात का ? विरोधकांना एवढीच कामं आहेत का ? राज्याच्या विविध भागात महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. पुणे, अकोल्यात होतंय मुख्यमंत्री काय करत आहेत ? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.