शेतकऱ्यालाही ‘लाडकं’ म्हणा ; सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये,राज ठाकरेंचा सरकारला इशारा !
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS NEWS | RAJ THACKERAY | GOVERNMENT OF MAHARASHTRA | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे १.७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. एक आणि दोन सप्टेंबर रोजी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम कृषी विभागाकडून अद्याप सुरू आहे. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. गणपतीच्या सणांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.राज ठाकरे म्हणाले कि गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान केले आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं.”
(संग्रहित दृश्य.)
निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील
शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं. तसंच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं. यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते आणि ती सुकायला वेळ लागतो. यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत.या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसंग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं”, असं आवाहन त्यांनी राज्य सरकारला केलं आहे.
बुलडाणा,चंद्रपूर,गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांना फटका
कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात राज्यातील ३६ पैकी २५ जिल्ह्यांना कमी-जास्त प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसला आहे . नुकसानीचे प्रमाण विदर्भात जास्त होत आहे. विदर्भात सुमारे ९७ हजार ६५२ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. बुलडाणा,चंद्रपूर,गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांना फटका बसला आहे. त्या खालोखाल मराठवाड्यातील हिंगोली,परभणी आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती. जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोल्हापूरमध्ये भात, ऊस, सोयाबीन, नाचणी, भुईमूग आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते.