अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांना खो ? आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री या शब्दाला रामराम !
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | CHIEF MINISTER EKNATH SHINDE | DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | GOVERNMENT OF MAHARASHTRA | LADAKI BAHIN YOJANA | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारानिमित्त महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांचे नेते राज्यव्यापी दौरे करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे या बाबतीत आघाडीवर आहेत. ते राज्याच्या वेगवेगळ्या भागात लाडकी बहीण योजनेचे मेळावे घेत आहेत,राज्यातील महिलांशी संपर्क साधत आहेत, तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या योजनेच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र या जाहिरातीमुळे महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या जाहिरातीच्या नावातून मुख्यमंत्री हा शब्द काढून टाकला आहे. त्यावर आता शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या योजनेच्या जाहिरातीत अजित पवारांनी आणलेली माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख करण्यात आला आहे. दादाचा वादा अजितदादांची लाडकी बहीण योजना. माझ्या अजितदादाने पैसे पाठवले असे संवाद या जाहिरातींमध्ये पाहायला व ऐकायला मिळत आहेत. महिलांच्या बँक खात्यात येणारे १५०० रुपये ही भेट नाही तर माझ्या दादाचं प्रेम आहे. महिलांच्या स्वप्नांच्या उड्डाणातील छोटा पंख आहे आणि दादा तर एकच आहे. ही दादांची लाडकी बहीण योजना आहे अशी एक जाहिरात समाजमध्यमांवर व्हायरल केली जात आहे.
(संग्रहित दृश्य.)
लोकांना समजण्याच्या दृष्टीकोनाने, आम्ही योजनेचं नाव लहान केलं !
या जाहिरातीवरून होत असलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उमेश पाटील म्हणाले आपल्याकडे केंद्र सरकारच्या अनेक योजना असतात. यापैकी बहुसंख्य योजनांना पंतप्रधानांचं नाव असतं. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या योजनांच्या नावात मुख्यमंत्री असा उल्लेख असतो. मात्र लाडकी बहीण योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याच्या व लोकांना समजण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही योजनेचं नाव लहान केलं आहे.
उमेश पाटील म्हणाले राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही योजना मांडली होती. अजित पवारांना या योजनेचं श्रेय घ्यायचं असतं तर त्यांनी ही योजना उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या नावाने सादर केली असती. मात्र त्यांनी या योजनेला मुख्यमंत्र्यांचं नाव दिलं आहे. हे नाव अजित पवारांच्या विचारांनीच दिलं आहे. अजित पवारांच्या मनात श्रेय घेण्याचा विचार असता तर कदाचित त्यांनी त्या योजनेला महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं किंवा स्वतःचं नाव दिलं असते. परंतु त्यांच्या मनात असा विचार आला नाही. मी पुन्हा एकदा सांगतो या योजनेचं नाव बदलेलं नाही. सरकारी कागदपत्रे अर्ज आणि इतर सर्व ठिकाणी त्या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणय योजना असंच आहे.