नागपूर : देवेंद्र फडणवीस उर्फ देवा भाऊ हेच दोन शब्द टॅगलाईन म्हणून वापरत भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या तोंडावर नागपुरसह राज्यात जोरदार प्रचार सुरू केलाय. आधी लाडकी बहिण योजनेच्या प्रचारासाठी भाजपने देवा भाऊ या टॅगलाईनचा वापर केला होता. आता शहरात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी झालेले विकास कामे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शहरात विविध भागात फलक लावत “देवा भाऊ” या आशयाने जोरदार प्रचार सुरू केलेला दिसतोय. विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता बघता गेल्या तीन चार दिवसांपासून शहरातील विविध भागात विकास कामांच्या भूमिपूजनाच्या आणि लोकार्पणाचा धडाका सुरू आहे. विदर्भातील विविध मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू झाली असून विविध विकास कामावरुन धन्यवाद देवा भाऊ असे फलक लावले गेले आहे.एरवी फडणवीस साहेब किंवा देवेंद्रजी असा उल्लेख फडणवीस यांच्याबाबत पक्षात केला जातो. पण लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर आता त्यांना “देवा भाऊ ” म्हणून संबोधले जात आहे. नागपूरला मेट्रो दिल्याबद्दल. धन्यवाद देवा भाऊ, नागपुरात एम्स रुग्णालय आणल्याबद्दल. आयआयएम आणि इतर शैक्षणिक संस्था सुरू केल्याबद्दल. नाग नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल, शहरातील तलावांचे सौंदर्यीकरण केल्याबद्दल. सर्व महत्त्वाचे चौक आणि प्रमुख सार्वजनिक स्थान, सर्वच ठिकाणी “देवा भाऊ” चे असेच होर्डिंग दिसून येत आहे आणि त्याद्वारे फडणवीस यांनी गेल्या अनेक वर्ष शहराचे नगरसेवक, महापौर, आमदार, राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला जात आहे.
(संग्रहित दृश्य.)
“देवाभाऊ” ही टॅगलाईन जास्त संयुक्तिक ?
देवेंद्र फडणवीस हे १९९९ पासून नागपुरात सलग २५ वर्ष आमदार आहेत. भाजपमध्ये आणि प्रशासनात त्यांनी वेगवेगळे पद भूषवले आहे. नागपूरकरांसाठी फडणवीस चांगलेच परिचयाचे आहेत. सामान्य नागरिकांशी देवेंद्र फडणवीस यांचा कनेक्ट वाढविण्यासाठी भाजपने ही “देवा भाऊ” या टॅगलाईनसह प्रचार सुरू केलाय. योगायोगाने राज्य सरकारच्या लाडकी बहीण या योजनेमुळे सध्या राज्यात लाडका भाऊ या शब्दाला ही तेवढीच प्रसिद्धी मिळत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यातील महिलांचे भाऊ म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करीत आहेत. त्यामुळे नागपुरात आधीच देवा भाऊ या नावाने सर्वांच्या परिचयाचे असलेले फडणवीस यांना “देवाभाऊ” ही टॅगलाईन जास्त संयुक्तिक वाटत असल्याने भारतीय जनता पक्षाने त्याच टॅग लाईनचा प्रचारासाठी वापर केला आहे.