आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते, कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार संतोष बांगर यांनी मतदारांना पैसे वाटण्याचे आमिष दिले होते. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर कळमनुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. १५ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींची घोषणा केली. एकीकडे निवडणुकांसाठी प्रचार जोर धरत असतानाच आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शिंदें गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार संतोष बांगर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
(संग्रहित दृश्य.)
निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला गुन्हा दाखल.
काही दिवसांपूर्वीच हिंगोलीच्या कळमनुरी शहरात संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांना फोन पे द्वारे पैसे पाठवतो असे विधान केले होते. निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर संतोष बांगर यांच्या विरोधात तक्रार दाखल करत गुन्हा दाखल केला आहे.विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान बोलताना संतोष बांगर यांनी मतदारांना पैसे पाठवण्याचे विधान केले होते. बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांची यादी दोन दिवसात आली पाहिजे. त्यांना आणण्यासाठी गाड्या करा. त्यासाठी काय लागेल ते सांगा. तसं फोन पे करा, असे संतोष बांगर म्हणाले होते. यावरुनच निवडणूक आयोगाने त्यांना मोठा दणका दिला आहे.