विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अहमदनगर शहर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पाठिशी शिवसैनिकांनी मोट बांधली आहे. शहरातील तुषार गार्डन येथे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. राज्यात पुन्हा कल्याणकारी योजना राबविणार सरकार आणण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी एकजुटीने निर्धार व्यक्त केला आहे. शहरात आघाडीत बिघाडी होण्याचे चिन्ह दिसत असताना, शिवसेनेने महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतल्याने प्रचारालाही मोठी गती आली आहे. शिवसेनेच्या बैठकीप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, नगरसेवक सुभाष लोंढे, माजी उपमहापौर गणेश भोसले, हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले, अनिल लोखंडे, काशिनाथ दाते, भिंगार शहर प्रमुख सुनिल लालबोंद्रे आदींसह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(संग्रहित दृश्य.)
शिवसैनिकांच्या माध्यमातून विजयाचा गुलाल अंगावर पडणार.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की खऱ्या शिवसैनिकांच्या माध्यमातून विजयाचा गुलाल अंगावर पडणार आहे. सध्या ऑक्टोबर हिटमध्ये थंडी, ऊन, वाऱ्यासारखे उमेदवारी अर्ज दाखल झालेले असून, हे क्षणिक असलेले वातावरण आहे. वर्षानुवर्षे नगरकारांच्या सेवेत असतांना अनेक विकास कामे करण्यात आली आहे. मतदार संघातील कोणताच परिसर शिल्लक नाही की जेथे विकास कामाच्या माध्यमातून मी पोहोचलो नाही. शहरात काल्पनिक चित्र रंगवण्याचे प्रकार सुरू आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी देखील या काल्पनिक कथांचा आनंद लुटावा, मात्र या काल्पनिक गोष्टींना कोणताही ठोस पुरावा नाही. अनेकांचे भाषण देखील एंटरटेनमेंट स्वरूपाचे झालेले असल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार असताना सातत्याने शहराच्या विकासासाठी व जनसेवेसाठी कार्य केले असून, याची पोचपावती विजयाच्या माध्यमातून नगरकर देणार असल्याची भावना जगताप यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा प्रमुख अनिल शिंदे म्हणाले की, शहरासह जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या पाठिशी शिवसेना ठामपणे उभी राहणार आहे. महायुतीचा धर्म पाळला जाणार असून, पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी जनतेने निवडणुक हातात घेतली आहे. महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या जनकल्याणकारी कामाचे प्रतिबिंब या निवडणुकीत मतांच्या रुपाने उमटणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहर प्रमुख सचिन जाधव म्हणाले की, फक्त लाडकी बहिणी योजना नव्हे, तर अनेक कल्याणकारी योजना राबवून महायुती सरकारने कल्याणकारी राज्ये चालवले. विरोधकांनी फक्त महायुतीला आरोप करण्याचे काम केले. जनता सुज्ञ असून, त्यांना आपले कल्याणकारी हित कशात आहे ? हे समजणार आहे. शहरात देखील आमदार जगताप यांनी मोठ्या प्रमाणात राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणून विकास कामे केली. शिवसैनिकांची विकासाला साथ राहणार असून, जगताप यांच्या पाठिशी उभे राहून विजयाचा आनंदोत्सव साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.