विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी उमेदवारी यादी जाहीर झाल्यापासून राज्यात नाराजी नाट्य सुरू झाले आहे. तिकीट न मिळाल्याने किंवा आपल्या आवडत्या उमेदवाराला तिकीट न दिल्यामुळे नेते मंडळींपासून ते पदाधिकारी सर्वच नाराज आहेत. अशामध्ये ते बंडखोरी करत पक्षांतर करत आहेत. अशामध्ये सोलापूरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. सोलापूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. निरंजन भूमकर यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे.
(संग्रहित दृश्य.)
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरात ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत गोविंद बाग येथे निरंजन भूमकरांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह १५ नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. निरंजन भूमकर हे वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. वैराग नगरपंचायतीवर निरंजन भूमकर यांची एक हाती सत्ता आहे.