महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी किरण काळे यांच्याशी संपर्क साधत उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर किरण काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहाने किरण काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दक्षिणेतील नगर शहरासह सहापैकी दोन जागा काँग्रेसला मिळाव्यात अशी काँग्रेसची स्थानिक व राज्य पातळीवर देखील मागणी होती. मात्र ही जागा विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी किरण काळे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची गळ घातल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करत काळे यांनी माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेऊन मतांचे विभाजन टाळण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एकसंधपणे निवडणूक जिंकण्या करिता काळे यांनी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेस आणि काळे समर्थकांचे संपूर्ण बळ कळमकर यांना निवडून आणण्याचे जाहीर केले. या निवडणुकीत ठामपणे कळमकरांना साथ देण्याची भूमिका किरण काळे यांनी घेतली असल्यची माहिती सूत्रांनी दिली आहे.