गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने रेकॉर्ड कामं केली आहेत. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्राला गौरव पुन्हा मिळाला आहे. भाजप महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. महायुतीचं अभिनंदन करतो. महाराष्ट्राला संजीवनी देण्यासाठी त्यांनी वचननामा दिल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी आज मोदी यांनी प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्रातून केला आहे. त्यांची धुळे जिल्ह्यामध्ये सभा झाली. यावेळी बोलताना मोदी यांनी महायुतीचे कौतुक केले. मोदी म्हणाले की, शिंदे यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्राला गौरव परत मिळाला आहे. माझे मित्र देवेंद्र, अजित पवार यांनी चांगल्या लोकांचा मनातील वचननामा केला आहे. राज्याची प्रगती होणार आहे. सक्षम आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विश्वास आहे. राज्याचा विकासाचा रोडमॅप आहे, असे ते म्हणाले.
(संग्रहित दृश्य.)
गाडीला चाक नाही, ड्रायव्हरच्या सीटसाठी भांडण चालू.
दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ते म्हणाले की तिकडे गाडीला चाक नाही, ड्रायव्हरच्या सीटसाठी भांडण चालू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांच रुप मानतो. जनतेच्या सेवेसाठी काम करतो. काहीजण जनतेला लुटण्याचा काम करत आहेत. प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार करतात. आपण आघाडीची आधीची अडीच वर्ष बघितली आहे. आधी सरकार लुटले, नंतर तुम्हाला लुटले. त्यांनी मेट्रो प्रकल्प बंद केले. समृद्धी महामार्ग बनवण्यात अडचणी आणल्या. वाढवण बंदराचं काम थांबवलं, असा आरोप मोदी यांनी केला आहे. त्यांनी पुढे सांगितले, विकसित महाराष्ट्र विकसित भारतचा आधार महायुतीचा वचननामा करेल. मोठ्या संख्येने महिला आल्या आहेत. त्या पुढे गेल्या तर समाज पूर्ण प्रगती करेल. मागील दहा वर्षात महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना आणल्या आहेत. मात्र, मागील सरकारने महिलांचा रस्ता अडवला होता. हा मोदी आहे अडचणी दूर करून सर्व दरवाजे खोलले असल्याचे ते म्हणाले. महिलांना आरक्षण दिले, शौचालय ते गॅस सिलेंडर अशा प्रत्येक ठिकाणी महिला केंद्रस्थानी आणल्याचे ते म्हणाले. आमचे विरोधक आमच्या योजनांचे मजाक उडवत होते. मात्र महिला सक्षमीकरण मुख्य मुद्दा असल्याचे ते म्हणाले. महायुती सरकारने आईचे नाव अनिवार्य केल्याचे सुद्धा ते म्हणाले.