महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढत होत असून सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. या प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. आता माढ्यातील महायुतीच्या सभेतील भाषणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
(संग्रहित दृश्य.)
वांग्याच्या शेतामधून कोट्यावधी उत्पन्न घेणाऱ्यांना…
गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी देखील लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. यावरून रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. रुपाली चाकणकर म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेवर सुरुवातीपासून विरोधकांनी टीका केली आहे. काँग्रेसवाल्यांनी तर सांगितले की आम्ही सत्तेत आलो की पहिले ही योजना बंद करू. मला प्रश्न पडला, इतकी चांगली योजना आहे. महिलांना दीड हजार रुपये मिळत आहे. पण ही योजना सगळ्यांना का बंद करायची आहे? तुतारीच्या खासदार बोलल्या दीड हजारामध्ये काय होतं? वांग्याच्या शेतामधून कोट्यावधी उत्पन्न घेणाऱ्यांना, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या आणि हॉटेलमध्ये दीड हजार रुपयांची टीप देणाऱ्यांना, दीड हजाराची किंमत काय कळणार? असा हल्लाबोल त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केला आहे. रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या, ही तुमची कोणती मानसिकता आहे. तुम्ही दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींचा अपमान केला आहे. तुम्ही जाहीररित्या माफी मागितली पाहिजे. कारण एका भावाने बहिणीला दिलेली ही ओवाळणी आहे. तिला आर्थिक सक्षम करण्यासाठी दिलेली ही ओवाळणी आहे. त्याची तुलना तुम्ही विकत घेण्यापासून तर बहिणीच्या नात्यापर्यंत करताय. हा आमच्या आत्मसन्मानाचा झालेला अपमान आहे. तुतारीवाले तुमच्या विरोधात आहेत. तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून ते विरोध करत आहे. कोर्टात जात आहेत. तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवत आहे. त्यामुळे जिथे जिथे तुतारीचा उमेदवार आहे त्याच्या विरोधात आपल्याला मतदान करायचे आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले आहे.