मला आता मुख्यमंत्रीपदामध्ये रस नाही, मी या रेसमध्ये नाही, असं देवेंद्र फडणवीस बोलत असले तरी भाजपने एकनात शिंदे आणि अजित पवारांचा पत्ता कट करुन फडणवीसांना मुख्यमंत्री करायचे हे ठरवले आहे. असे वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. त्यांनी एका मराठी बेव पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले आहे. खरं म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना फोडताना देवेंद्र फडणवीस यांना स्वत:ला मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. त्यावेळी वरुन आदेश आला, तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले होते. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचंय, हे सत्य आहे. अन्यथा मी पुन्हा येईन, ही घोषणा कशातून आली, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. अमित शाह यांनी तीनवेळा सांगितलं आहे की, पुढचं सरकार भाजपचं म्हणजे मुख्यमंत्री भाजपचा. देवेंद्रजी नेतृत्व करतील. अमित शाह ही गोष्ट बोलतात, याचा अर्थ हे मोदींनाही मान्य आहे. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट करुन देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं हे ठरलेलं आहे. पण देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा करायला भाजपचे धाडस होत नाही. तसे केल्यास एकनाथ शिंदे आणि अजित पवार नाराज होऊ शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी काहीशी सॉफ्ट भूमिका घेतली आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना नाराज होण्याचा कोणताही हक्क नाही. कारण त्यांनी भाजपचं मांडलिकत्त्व स्वीकारलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे की नाही, हे लहान पोरगंही सांगेल. राज्यात महायुतीची सत्ता येणार नाही. पण चुकून महायुती सत्तेत आली तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. सत्ता न आल्यास देवेंद्र फडणवीस हेच विरोधी पक्षनेते असतील, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.