औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांच्या प्रचारासाठी शहरात आलेले कालीचरण महाराजांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना राक्षस म्हणत हल्लाबोल केला आहे. हिंदू मतदानाला जात नसल्यामुळे मुस्लिम राजा होतो, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है, अशा घोषणांनी महायुतीच्या प्रचाराचा रोख राहिला आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील उमेदवार संजय शिरसाट यांनी कालीचरण महाराजांना प्रचारासाठी पाचारण केले होते. त्यांनी मराठवाड्यातील कळीचा मुद्दा असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर जहरी टीका केली आहे. कालीचरण महाराज म्हणाले, मनोज जरांगेला जातीच्या आरक्षणाशी काहीही देणे-घेणं नाही. जरांगे हा हिंदुत्त्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे. हिंदू मतदानाला जात नाहीत, त्यामुळे मुस्लिम धार्जिने सत्तेवर जातात, असा आरोप कालीचरण यांनी केला आहे. ते म्हणाले, आता दर पाच वर्षांनी निवडणूक होते आणि मतदानातून राजा ठरतो. राजा कसा असला पाहिजे हे, ठरवण्याचा अधिकार मतदारांचा आहे. मात्र हिंदू लोक मतदानाला जात नाहीत. मग राजा कोण येणार, तो म्हणजे मुस्लिमांचे तळवे चाटणारा. पुढे मनोज जरांगे यांच्यावर बोलताना कालीचरण यांची जीभ घसरली. ते म्हणाले, आता एक आंदोलन सुरु झालं होतं. हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं. कशी हवा होती त्या आंदोलनाची, लाखो लोक मुंबईत आले होते. त्यांच्या नेत्याने थडग्यावर चादर चढवली. यामध्ये जातीपातीच्या आरक्षणाच्या काही गोष्टी नाहीत. यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे राक्षस. अशी टीका कालीचरण महाराज यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठवाड्यात मोठा फटका बसला. मराठवाड्यातील आठ पैकी सात जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. महायुतीला मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसल्याचे महायुतीच्या नेत्यांनी म्हटले होते. आता विधानसभेत हा फटका बसू नये म्हणून संजय शिरसाट यांनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात हिंदूत्वाचे कार्ड खेळले आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचे राजू शिंदे यांना मैदानात उतरवले आहे.